Wednesday 11 July 2018

साथरोग प्रतिबंध


पावसाळ्यात साथीच्या आजारांबाबत काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक, 11 : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विविध साथीचे आजार फैलावतात त्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, टायफाईड, कावीळ, स्वाईन फल्यु, चिकणगुणिया इत्यादी विविध आजारांना सामोरे जावे लागते. यादृष्टिकोनातुन नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.  
नागरिकांनी  कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, हगवण, काविळ होवू नये म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोरचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे, मानवी विष्टेची योग्य विल्हेवाट लावावी तसेच उघड्यावर शौच करू नये,  क्षारसंजीवनीचा वापर करावा, पेज, सरबत इत्यादी घरगुती पेयांचा वापर करावा. तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी भरती करावे.
हिवताप, चिकणगुनिया, डेंग्यु असे आजार टाळण्यासाठी गावातील नाल्या, गटारी स्वच्छ कराव्यात. पाणी साठवू न देता वाहते करावे. गावात कुणालाही ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यास त्वरीत कळवावे व रक्त तपासणी करुन उपचार घ्यावा. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. प्रत्येक इमारतीमध्ये किंवा परिसरात निकामी टायर्स, फुटक्या बाटल्या नारळाच्या करवंट्या, फुटके प्लॅस्टिक ड्रम्स, माठ यासारखे अडगळीचे साहित्य असणार नाही याची काळजी घ्यावी. पाणीसाठ्यात गप्पीमासे सोडावे, त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राकडे मागणी करावी. रिकामे करता न येणाऱ्या पाणीसाठ्यात ॲबेट, टेमिफॉस द्रावणाचे थेंब टाकावेत.
स्वाईन फल्यु  हा आजार हवेवाटे पसरतो. आजारी व्यक्तिच्या शिंकण्या-खोकल्यातून या आजाराचे विषाणू एका रुग्णातून इतर निरोगी व्यक्तिंकडे पसरतात. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टिक आहारासह लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे, भरपुर स्वच्छ पाणी प्यावे तसेच पुरेशी झोप व‍ विश्रांती घ्यावी.
जिल्ह्यामध्ये सदर आजारांचे रुग्ण आढळून आल्यास साथरोग नियंत्रण कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक (दूरध्वनी क्रमांक 0253-2508512) येथे संपर्क साधावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment