Monday 16 July 2018

दुध वाहतूक


दुधसंघांनी दुधाची वाहतूक सुरू ठेवावी-जिल्हाधिकारी

          नाशिक, 16 : जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दुधसंघांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून इतरत्र होणारी दुधाची वाहतूक सुरू ठेवावी, वाहनांना पोलिस संरक्षण देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुधसंघ प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर आदी उपस्थित होते.

          श्री.राधाकृष्णन म्हणाले, दुधाच्या टँकरची वाहतूक करताना जिल्हा प्रशासन अथवा पोलिस यंत्रणेशी समन्वय साधावा. दुध वाहतूकीचे वेळापत्रक प्रशासनाकडे दिल्यास वाहनांना तात्काळ पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संघांनी दुध संकलना सुरू ठेवावे. संकलनात समस्या आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. तालुकासंघांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता दुध संकलन केंद्र सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
          जिल्ह्यातील दुधाची वाहतूक सुरळीतपणे सुरू असून आतापर्यंत 15 टँकर मुंबईकडे पोलिस संरक्षणात पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
          जिल्ह्यातील दुध संकलन, वाहतूक, विविध दूधसंघाकडून होणाऱ्या दुधाची दैनंदिन वाहतूक आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. दुधवाहतुकीसाठी प्रशासनातर्फे सहकार्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष 0253-2315080/2317151 किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी 0253-2303044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.
         
                                                  000000


No comments:

Post a Comment