Wednesday 1 August 2018

महसूल दिन


 उत्तम कामगिरीसाठी एकाग्रता आवश्यक : राजाराम माने

       नाशिक दि. 01 :  महसूल संबंधी कामकाज करतांना उत्तम कामगिरीसाठी मनाची एकाग्रता व समर्पितवृत्तीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, सेवानिवृत्त आदिवासी आयुक्त आर.जी. कुलकर्णी, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी.जी. वाघ, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आदी उपस्थित होते.
          श्री.माने म्हणाले, कार्यालयीन कामकाज करताना ते नियोजनबद्ध पद्धतीने केले तर ते कालमर्यादेत व योग्यरितीने पूर्ण करता येते व केलेल्या कामाचे समाधान देखील मिळते. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात केल्यास ते अधिक गतिमान करता येते, असे त्यांनी सांगितले.

          श्री. कुलकर्णी म्हणाले, बदलत्या काळानुसार आपल्या कामात गतिमानता आणणे आवश्यक आहे. महसूल यंत्रणाही प्रशासनातील महत्वाचा घटक आहे. महसूल यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचारी यांना संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
          कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करणे महत्वाचे आहे. विकासाला गती देणारी यंत्रणा म्हणुन महसूल विभाग ओळखला जातो. त्यामुळे या विभागामार्फत होणारे काम हे समाजव्यवस्थेत बदल घडवून आणणारे असते, असे श्री. वाघ म्हणाले,
          प्रास्ताविकात श्री. स्वामी यांनी कर्तव्याची अंमलबजावणी करण्यास चालना देण्यासाठी महसूल दिनाचे आयोजन करण्यात येते, असे सांगितले.

 कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या शिपाई, वाहनचालक, लिपिक, लघुलेखक, नायब तहसिलदार, तहसिलदार संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
          तत्पुर्वी महसुल दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय माहिती कार्यालय व विभागीय ग्रंथालय यांचेमार्फत भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.  
0000


No comments:

Post a Comment