Monday 6 August 2018

वारली रांगोळी विक्रम


श्रद्धा कराळेने वारली रांगोळी साकारत नोंदवले विक्रम

नाशिक, 6 : आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहोचावी ह्या हेतूने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फुट वारली  रांगोळी काढून पाच विक्रम साकार केले.
 
एकलव्य रेसिडेन्सिअल स्कूल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहकार्याने साकारलेल्या विक्रमाबद्दल  श्रद्धाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अमन मित्तल, वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या परीक्षक अमी छेडा, प्राचार्य सुरेश देवरे, लक्ष्मण सावजी, कविता बोंडे आदी उपस्थित होते.

रविवारी दुपारी 2 ते रात्री 8 या सहा तासाच्या कालावधीत श्रद्धाने रांगोळी काढून विश्वविक्रम केला.  रांगोळीत  सण-उत्सव, नृत्य, झोपडी, शेती, तारपा वाद्य, पशु-पक्षी तसेच आदिवासींची संपूर्ण दिवसाची दिनचर्या रांगोळीद्वारे रेखाटण्यात आली आहे. या विक्रमात वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, जीनिअस बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, गोल्डन स्टार ऑफ रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड ऑस्ट्रलिया, भारत बुक ऑफ रेकॉर्ड मॉरिशस आदींचा समावेश आहे.

यावेळी खासदार चव्हाण म्हणाले, संस्कृती जपणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.   आदिवासी संस्कृतिचा अभ्यास करीत रांगोळीच्या माध्यमातून जगभरात ओळख निर्माण करणे हा आदिवासी समाजाचा सन्मान आहे.‍ विक्रम साकारणाऱ्या श्रद्धाची जिद्द व मेहनत वाखण्याजोगी आहे. आदिवासी कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते श्रद्धाचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. मित्तल म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात केल्यास यश संपादन करता येते. आदिवासी कलागुणांसाठी  सतत  प्रयत्नरत असलेल्या ‍विद्यार्थीनींचा जागतिक पातळीवर उल्लेख होणे हा आदिवासी विभागाचा गौरव आहे.

00000

No comments:

Post a Comment