Sunday 5 August 2018

जिल्हा नियोजन समिती


रस्ते-सिंचनाच्या माध्यमातून राज्याची विकासाकडे वाटचाल-गिरीष महाजन

       नाशिक दि. 5 :- रस्ते विकास आणि सिंचन सुविधांच्या माध्यमातून राज्याची विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे . येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे राज्यात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन  योजनेअंतर्गत 40 हजार कोटी मंजूर केले आहेत. तसेच बळीराजा योजनेअंतर्गत नुकतेच 13 हजार 651 कोटींच्या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. राज्य सरकारदेखील टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे  राज्यातील सिंचन व्यवस्थेचे चित्र बदलणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्याला सिंचन विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विविध ठिकाणी रस्ते विकासाच्या कामांनादेखील केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरवात करण्यात आली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन त्याचा विकासावर चांगला परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.

          श्री.महाजन म्हणाले, जिल्ह्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कुणीही उघड्यावर शौचास जाणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी व्यक्तिश: प्रयत्न करावेत. अस्वच्छतेमुळे रोगराई वाढत असल्याने गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.  शौचालय बांधण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

          जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा उल्लेख करून पालकमंत्री म्हणाले, अधिकाऱ्यांनी  सतर्कता बाळगावी. पाण्याचे योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा. लवकरच पाण्याच्या नियोजनाबाबत  मुंबईत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. ग्रामीण भागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित रहाणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जलयुक्त्‍ शिवारमुळे पहिल्या पावसात गावात जलसाठा निर्माण झाल्याने गावांना फायदा झाल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले.

          बैठकीत कुपोषण, पाणी पुरवठा, जिल्हा परिषद शाळा इमारती, आरोग्य सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याने घरकूल योजनेत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
          स्मार्ट सिटी अंतर्गत 322 कोटींची विकासकामे होणार आहेत. निफाडला उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांना लाभ होईल. त्र्यंबकेश्वर येथे 25 एकर परिसरात योग विद्यापीठ तर मुंगसरे येथे अन्न व औषध प्रशासनाची आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. नाशिकचे धार्मिक महत्व लक्षात घेता अवयवदानाचा प्रसार करण्यासाठी ‘ऑर्गन टेंपल’ उभारण्यात येईल, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.

          बैठकीस आमदार जीवा पांडू गावीत, राजाभाऊ वाजे, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, अनिल कदम, डॉ.राहुल आहेर, निर्मला गावित, देवयानी फरांदे, पंकज भुजबळ, दिपीका चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
          जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2017-18  या वर्षात एकूण प्राप्त 858.17  कोटी निधीपैकी 838.48 कोटी खर्च करण्यात आला. 2018-19 साठी  917.94 कोटी मंजूर नियतव्ययापैकी 646.25 कोटी प्राप्त झाला असून  त्यापैकी 142.36 कोटी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधीपैकी आतापर्यंत 28.56 कोटी निधी खर्च झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत समिती सदस्यांनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नवनियुक्त समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
----
         

No comments:

Post a Comment