Wednesday 15 August 2018

युवा माहिती दूत


दुर्गम भागात ‘माहिती दूत’ उपयुक्त-गिरीष महाजन


नाशिक दि.15 : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘युवा माहिती दूत’ हा अतिशय  उपयुक्त आणि कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

          विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी  आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.


          श्री.महाजन म्हणाले, शासकीय योजनांचे बहुतांश लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यंत वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ आदी माध्यमे पोहचण्यासाठी मर्यादा येतात. अशा लाभार्थ्यांपर्यंत राज्यातील एक लाख युवकांच्या माध्यमातून विविध 50 योजनांची माहिती पोहोचणार आहे.
          जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने हाती घेतला आहे. गरीब माणसाला त्याच्यासाठीच्या योजनांची माहिती उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अडीच कोटी जनतेपर्यंत या उपक्रमाद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न आहे. अधिकाधिक महाविद्यालयीन तरूणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले.
          कार्यक्रमाच्या सुरूवातीला युवा माहिती दूत उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ.मोघे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. मोबाईल ॲपद्वारे उपक्रमासाठी नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 यावेळी चित्रफीतीद्वारे उपक्रमाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला उपायुक्त रघुनाथ गावडे, दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डी. पी. नाथे, एनएसएसचे जिल्हा समन्वयक रवींद्र अहिरे, सहायक संचालक अर्चना देशमुख, माहिती अधिकारी मोहिनी राणे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.       
                                                    0000

No comments:

Post a Comment