Friday 24 August 2018

गोवर लसीकरण


 लसीकरण अभियानाबाबत जनजागृतीवर भर द्या-डॉ.नरेश गिते

          नाशिक, 24 : गोवर आणि रुबेला आजारामुळे बालकांवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण अभियानाबाबत जनजागृतीवर विशेष भर देण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, आदी उपस्थित होते.
          डॉ.गिते म्हणाले,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या विविध पैलूंची माहिती  प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात यावी. अभियान मानव विकासाच्यादृष्टीने महत्वाचे असल्याने अभियानाचे गांभिर्य सर्व स्तरावर पोहोचविण्यासाठी संवाद यंत्रणेचा अधिक सक्षमपणे उपयोग करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
          यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा पर्यवेक्ष डॉ.कमलाकर लष्करे यांनी अभियानासंदर्भात माहिती दिली. मिझल्स-रुबेला हे देशातील पहिले मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणारे इन्जेक्टेबल अभियान आहे. दक्षिणपूर्वेच्या देशातून 2020 पर्यंत हा आजार हद्दपार करण्यासाठी विविध देशांमधून प्रयत्न होत आहेत.
          मिझल्स (गोवर)मुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या एक लाख 34 हजार बालकांपैकी 49 हजार बालके भारतातील आहेत. या आजारामुळे कायमस्वरुपी आंधळेपणा लुळेपणा, डायरीया असे दुष्परीणाम दिसून येतात. तर रुबेलाचा संसर्ग गर्भवती महिलेस झाल्यास नवजात बालकास अंधत्व, बहिरेपणा, हृदय विकृती संभवते. त्यामुळे 9 महिन्यापासून 15 वर्षापर्यंतच्या किंवा दहावीपर्यंतच्या मुलांना अभियानांतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साधारण 19 लाख बालकांना पाच आठवड्याच्या अभियानाद्वारे लसीकरण करण्यात येईल.
          हे अभियान देशातील 21 राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. फेब्रुवारी 2017 पासून आतापर्यंत देशातील 9 कोटी 60 लाख बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक बालकासाठी वेगळी सिरींज वापरण्यात येणार आहे. एका शाळेत एकाच दिवशी लसीकरण करण्यात येणार असून 200 विद्यार्थ्यामागे एका प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची लसीकरणासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती  यावेळी देण्यात आली.
----

No comments:

Post a Comment