Wednesday 15 August 2018

स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिन


गरीबांना हक्काचे घर देण्याचे प्रयत्न-गिरीष महाजन

       नाशिक दि. 15 :- घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथम क्रमांकावर असून ग्रामीण भागात विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून 21 हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात प्रधानमंत्री  आवास योजनेअंतर्गत 30 हजार कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय  स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री.महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे,  आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप,  विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, उपस्थित होते.

          पालकमंत्री  म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना वीज जोडणी आदी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात  येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षात 447 गावे जलसमृद्ध झाली आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 1 लाख 49 हजार शेतकऱ्याना 793 कोटी 29 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
          प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांना 16 हजार 633 कोटी आणि  बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून 83 प्रकल्पांना सुमारे 17 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे राज्यातील सिंचन व्यवस्थेचे चित्र बदलेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          मराठा समाजातील युवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगारासाठी सहकार्य करण्यात येत आहे. मेरी येथे विद्यार्थी वसतीगृहासाठी दोन इमारतींच्या हस्तांतरणाला मंजूरी दिल्याचे श्री.महाजन म्हणाले.

          मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यात चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात चांगली कामगिरी केल्याबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वर्षी 50 कोटींचे उद्दीष्ट पुर्ण करण्यात जिल्ह्याचे मोठे योगदान मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 यावर्षी पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि लोकसहभागातून अधिकाधीक पाणी अडविण्यात यावे, असे आवाहन श्री.महाजन यांनी केले. स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिन महोत्सव म्हणून साजरा करा


 समाजात राष्ट्रप्रेम रुजविण्यासाठी आणि राष्ट्रभावना वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन महोत्सवाच्या रुपाने साजरा करावा, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले. पुढील वर्षापासून या दिवसाच्या निमित्ताने तीन दिवस देशभक्तीपर कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करावे. नाशिकपासून या उपक्रमाची सुरूवात करावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. धर्म, जात, भाषा, प्रांत यापेक्षा राष्ट्र सर्वोच्च आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च  प्राधान्य देण्याचे संस्कार नव्या पिढीवर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

          विविध पुरस्कारांचे वितरण


पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी): रकिबे अशिष, देव साहिल, नारकर रुता, देशमुख नुपुर
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) : बोराडे सानिका, ओस्तवाल अंशु, पृष्टी साहिल, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा: हिरे अक्षय, काग्रा चार्वो, ओम गुंजाळ, वेदांत देव, अनुराग कोठारी, कार्तीक हासे, प्रथम कापुरे, रिदम ढाके, जनमयर भडांगे या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
          स्मार्ट ग्रामयोजनेअंतर्गत अवनखेड ता.दिंडोरी, सुकेणे ता.निफाड, डांगसौंदाणे ता.बागलाण, सावकी ता.देवळा, शिरसाने ता.चांदवड, जळगांव नेऊर ता.येवला, बोरवठ ता.पेठ, वाडीवऱ्हे ता.इगतपुरी, विंचुरदळवी ता.सिन्नर, भैताने (दि.) ता.कळवण, शिदे (दि.) ता.सुरगाणा, खायदे ता.मालेगाव, माळेगाव ता.त्र्यंबक, लहवित व शिंदे नाशिक (विभागून), आमोदे ता.नांदगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय तसेच अवनखेड ता.दिंडोरी या  ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

          संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पारितोषिक अवनखेड ता. दिंडोरी ग्रामपंचायत (प्रथम), राजदेरवाडी ता.चांदवड (द्वितीय) आणि बोराळे ता.नांदगाव (तृतीय) या ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
          लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु भवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर अरुण अहिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबड पोलीस स्टेशन, अरिफखा पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक सुभाष नाना जाधव, सहाय्यक पोलीस  उपनिरिक्षक नाशिकरोड पोलीस स्टेशन यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. आयएसओ 2001:2015 प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या पोलीस कार्यालयांनादेखील पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते  गौरविण्यात आले. श्री.महाजन यांच्या हस्ते नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा


       जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर तंबाखुमुक्तीसाठी  शपथ घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते.
----

No comments:

Post a Comment