Tuesday 14 August 2018

जिल्हा रुग्णालयात एनआयसीयु


जिल्हा रुग्णालयात लवकरच एनआयसीयु सुरू करणार-डॉ.दीपक सावंत

नाशिक दि.14- आदिवासी भागातील बालमृत्युदर कमी करण्यासाठी कळवण आणि त्र्यंबक येथे नवजात शिशू अतिदक्षता विभाग सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली असून अतिगंभीर आजाराच्या बालकांवर उपचार करण्यासाठी लवकरच जिल्हा शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेला एनआयसीयु  कक्ष सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.
डॉ.सावंत यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन प्रसूतीगृह आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागाची पाहणी केली. गेल्या वर्षी झालेल्या बालमृत्यू प्रकरणानंतर करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.सुरेश जगदाळे, डॉ. पंकज गाजरे, डॉ.कृष्णा पवार, डॉ. नरेंद्र बागूल, डॉ. सुप्रिया गोरे आदी उपस्थित होते.

डॉ.सावंत म्हणाले, बालमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. मुंबईच्या पथकाने नाशिकला भेट दिल्यानंतर सुचविलेल्या सुधारणांनुसार कार्यवाही करण्यात आल्याने बालमृत्यूदर 8 पर्यंत खाली आला आहे. हा दर मानकापेक्षा कमी असला तरी यात सुधारणा करण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नवजात बालकांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले.

नवा कक्ष सुरू करण्यापूर्वी न्यूऑनॅटोलॉजिस्टची नेमणूक करण्याचा प्रयत्न आहे. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत नवजात बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना देण्यात आल्या असून दर महिन्यातून एकदा या संदर्भात आढावा घेण्यात येईल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
कुपोषणाच्या दरात 30 टक्क्यांनी घट झाली आहे. पंचसुत्री उपाययोजनांमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे पालघरमधील कुपोषण कमी करण्यात यश आल्याने नाशिक व मेळघाट येथे हाच पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ.जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  
************

No comments:

Post a Comment