Thursday 9 August 2018

जागतिक आदिवासी दिन


आदिवासी विद्यार्थ्यांचे जागतिक पातळीवरील यश कौतुकास्पद-राधाकृष्णन बी. 

          नाशिक, 9 : महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी आपल्या कर्तुत्वाच्या बळावर कला-क्रिडा क्षेत्रात जागतिक पातळीवर मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
गोविंद नगर येथे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, आदिवासी विभागाचे सहसचिव सुनिल पाटील, आदिवासी विकासचे आयुक्त किरण कुलकर्णी, अपर आयुक्त दिलीप गावडे, प्रकल्प अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी मुलांचे कौतुक करत श्री. राधाकृष्णन म्हणाले, प्रयत्नपूर्वक आव्हानांना सामोरे गेल्यास सर्व समस्यांवर मात करता येते. क्रीडा क्षेत्रात यशस्वी युवक-युवतींनी हे सिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी शासनस्तरावरील निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डीबीटीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ थेट विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

श्रीमती भानसी म्हणाल्या, आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क देण्यासाठी विविध स्तरावर आदिवासी योजनांविषयी जनजागृती करण्यात येईल. आदिवासी  मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच आदिवासी बोली भाषेतील पुस्तकांचे प्रकाशान होत असल्याबद्दल श्रीमती सांगळे यांनी समाधान व्यक्त केले. आदिवासी समाजात स्त्री-भ्रुण हत्या थांबवुन मुलीचे स्वागत केले जाणारे स्वागत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोषण निमुर्लनाच्या प्रयत्नांना गती देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती हिरे म्हणाल्या, आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार होत असून शारीरीक क्षमतेबरोबर त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत आहे. नाशिकमधील कविता राऊत, मोनिका आथरे यांसारख्या आदिवासी खेळाडुंचे यश जिल्ह्यासाठी गौरवास्पद असल्यसाचे त्यांनी सांगितले.

कुपोषणावर मात करण्यासाठी अमृत आहार योजनेच्या माध्यमातून शासन प्रयत्न करत असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. आदिवासी मुलांच्या शिक्षणावरही भर देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहा आदिवासी बोली भाषेतील शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. दहावी आणि बारावी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा यावेळी पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागातील निवडक हस्तकला व मुर्तीकला यांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी बांधवांनी  वेगवेगळ्या प्रांतातील आदिवासी डांगी नृत्य, तारपा नृत्य, ढोलनाच, घोचनाच आदी नृत्यप्रकार सादर केले.
00000

No comments:

Post a Comment