Saturday 3 November 2018

निवासी शाळा लोकार्पण


रस्त्यांच्या निर्मितीतून ग्रामीण विकास शक्य -चंद्रकांत पाटील


       नाशिक दि.3- ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यांची निर्मिती  आणि तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महत्वाचे असल्याने हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत रस्त्यांचा  विकास करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
          पिंपळगाव येथे सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळेचे लोकार्पण, ग्रामीण रुग्णालय भूमीपूजन आणि हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

          कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे,  आमदार नरेंद्र दराडे, अनिल कदम, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते.

          श्री.पाटील म्हणाले, हायब्रीड अन्युईटी अंतर्गत रस्त्याचा विकास करतांना 60 टक्के रक्कम रस्ते पुर्ण होते वेळी व 40 टक्के रक्कम येत्या दहा वर्षात देण्यात येईल. गेल्या चार वर्षात केंद्राकडून राज्यातील रस्त्यांसाठी 1 लाख 6 हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात आला असून रस्ते विकासासाठी राज्याने 30 हजार कोटीचा निधी दिला आहे. हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत 10 हजार किमी रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          यंदाच्या वर्षी  कमी पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन  या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार 268 मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार दुष्काळ सदृश्य भागात आवश्यक सवलती देण्यात येतील,  असेही श्री.पाटील यांनी  सांगितले.

          शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्राधान्याने तयार करण्यात येणारा नदीजोड प्रकल्प तसेच शेतकरी कर्जमाफी आदी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जनहित योजनांसाठी सहकार्य राहील, असे श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. विकासकामे वेळेवर पुर्ण व्हावीत यासाठी जनतेने कामांच्या प्रगतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अत्याधुनिक प्रकारच्या आरोग्य सुविधा जनतेसाठी उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.

          श्री. महाजन म्हणाले, शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शाश्वत पाण्याच्या नियोजनासाठी नदी जोड प्रकल्पावर भर देण्यात आला आहे.  या अंतर्गत नार-पार, दमणगंगा-पिंजाळ  या प्रकल्पांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत. जलप्राधिकरणाच्या नियमानुसार मराठवाड्याची गरज लक्षात घेऊन पाणी देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
         
0000

No comments:

Post a Comment