Friday 23 November 2018

‘सोताचं’ शेत फुलवायचं


करंबळे गावातील शेवंताबाईंना आता सोताचंशेत फुलवायचं

       नाशिक दि.24-कळवण तालुक्यातील दुर्गम अशा करंबळे गावातील शेवंताबाईंना  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर बांधून मिळाल्याने त्यांच्या कोरडवाहू शेतात टमाट्याचे पीक उभे राहिले आहे.
       शेवंताबाई बागुल आणि त्यांचे पती हिरामण बागुल शेतमजूरी करून वर्षानुवर्ष कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. दोन मुले कष्टाने मोठी केली. आपल्या दोन एकर शेतात  पाणी असेल तेवढे मका-सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचे आणि कुटुंबापुरता दाणा साचवायचा एवढेच त्यांना माहित होते. इतर खर्चासाठी मजूरीवर अवलंबून रहावे लागे.

       यावर्षी  ग्रामपंचायतीतून सिंचन विहीरीची माहिती त्यांना मिळाली आणि विहिरीसाठी अनुदानही मिळाले. त्यांना पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी डी.एम. बहिरम आणि मनरेगा कक्षाचे विशेष सहकार्य मिळाले.
       स्वत: अकुशल काम केल्याने 71 हजार आणि कुशल कामासाठी 85 हजार अनुदान त्यांना रोहयोअंतर्गत मिळाले. विहिरीवर इलेक्ट्रीक मोटार आणि पाईप बसवून मिळाला. त्याचे 26 हजार वेगळे अनुदान मिळाले.

        विहिरीला चांगले पाणीदेखील लागले आहे. शेतासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतात प्रथम टमाट्याचे पीक उभे राहिले आहे. कांदा आणि गाजरदेखील काही प्रमाणात लावले आहे.
       मजूरी करताना विहिरीसाठी पैसे उभारणे अशक्य होते. शासनाच्या योजनेमुळे आता मजूरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, किमान प्रमाणतरी कमी होईल यांचे समाधान या दाम्पत्याला आहे. आता स्वत:च्या शेतात कष्ट करून उदरनिर्वाह करता येईल याचा आनंद शेवंताबाईंना आहे.
----


No comments:

Post a Comment