Friday 23 November 2018

विभागीय क्रीडा स्पर्धा


लेखा व कोषागारे विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

          नाशिक दि.24- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती आयोजित नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांचे  उद्घाटन तापी खोरे विकास महामंडळाचे वित्त संचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

          यावेळी संचालक (प्र) जितेंद्र इंगळे, सहसंचालक (वित्त व लेखा) राजेश लांडे, नाशिक विभागाचे सहसंचालक निलेश राजूरकर, गिरीश देशमुख, मनपाचे मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव, मुख्य लेखा अधिकारी सुहास शिंदे,  आदिवासी विकास महामंडळाचे वित्त महाव्यवस्थापक उत्तम कावडे, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी विकास गांगुर्डे आदी उपस्थित होते.   

          यावेळी श्री.घोरपडे म्हणाले, लेखा व कोषागारे विभागात काम करताना  शरीर व मन सदृढ असणे गरजेचे आहे. यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे आहे. खेळामुळे दैनंदिन कामातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो. स्पर्धांच्या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आल्याने कार्यसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

       दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडुंनी सहभाग घेतला आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धीबळ, व्हॅालीबॉल, मैदानी स्पर्धा आदी विविध क्रीडा प्रकारात स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती श्री.देशमुख यांनी दिली.

          यावेळी घेण्यात आलेल्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रंजन देशमुख (पुरुष) व प्रमिला जाधव (महिला) या नाशिकच्या स्पर्धकांनी विजय मिळविला. तर 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेतदेखील नाशिकच्या दिपक बर्गे आणि बबिता गिरी यांनी विजेतेपद पटकाविले.
----


No comments:

Post a Comment