Friday 9 November 2018

स्कुल ऑफ आर्टीलरी



मेक इन इंडियाद्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचा प्रयत्न

                               -संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन

         नाशिक, 9 : मेक इन इंडियाद्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून या माध्यमातून सैन्य दलातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रीयेला वेग देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
स्कुल ऑफ आर्टीलरीच्या देवळाली फायरींग रेंज येथे श्रीमती सीतारामन यांच्या हस्ते के-9 वज्र आणि  एम-777 होवित्झर या अत्याधुनिक तोफा तसेच  कॉमन गन टोवर देशाला समर्पित आणि सैन्य दलाच्या सुपूर्द करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सेना प्रमुख जनरल बिपीन रावत, आर्टीलरीचे महासंचालक पी.के. श्रीवास्तव उपस्थित होते.

श्रीमती सीतारामन म्हणाल्या, एकाचवेळी दोन अत्याधुनिक तोफा भारतीय सेनेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही संपुर्ण प्रक्रीया अत्यंत कमी वेळेत पुर्ण करण्यात आली  आहे. 30 वर्षानंतर भारतीय सेनेत नव्या तोफा समाविष्ट होत आहेत. 25 एम 777 होवित्झर तोफा अमेरिकेकडून तयार करून घेण्यात आल्या असून उर्वरीत 120 तोफांची निर्मिती भारतात करण्यात येणार आहे. दुर्गम भागात आणि रस्त्यांची सुविधा नसलेल्या युद्धभूमीवर या  तोफा उपयुक्त ठरतील.

दक्षिण कोरीयाकडूनन 10 के-9 वज्र तोफा घेण्यात आल्या असून त्यांची जुळणी भारतात करण्यात आली आहे. उर्वरीत 90 तोफांचे पुर्णत: उत्पादन  भारतात करण्यात येईल. या तोफा संपुर्णपणे स्वयंचलित आहेत. कॉमन गन टोअरचे उत्पादनही देशातच होणार आहे. या तिन्हींच्या समावेशामुळे नवभारतासाठी आवश्यक सक्षम तोफखाना दल निर्माण करण्यात मदत होईल. या प्रक्रीयेसाठी कालावधी अपेक्षित असला तरी भारतीय सेना ही प्रक्रीया वेगाने पुढे नेईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

त्या म्हणाल्या, सैन्य दलाच्या आधुनिकीकरण प्रक्रीयेसाठी कालावधी देशासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी तोफखाना दल अत्यंत महत्वाचे असते. या दोन तोफांच्या समावेशाने संरक्षण उत्पादानाच्या क्षेत्रातील सिद्धतेसोबतमेक इन इंडियाप्रक्रीयेला चालना मिळेल.
संरक्षण उत्पादने देशात तयार केल्यामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग वाढेल. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जात भारतीय उद्योग क्षेत्र संरक्षण उत्पादनात स्वयंपुर्णता गाठण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी भारतीय तोपखाना दलाच्या क्षमतेचे प्रदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. कार्यक्रमानंतर श्रीमती सितारामन यांनी वीरमाता आणि वीरपत्नींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
भारतीय सेनेत दाखल झालेल्या अल्ट्रा लाईट एम 777 होवित्झर तोफा वेगवान हालचालींसाठी उपयुक्त्असून त्यांची  मारक क्षमता 31 किलोमीटरपर्यंत आहे. के-9 वज्र स्वयंचलित तोफा 38 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. आधुनिक प्रकारच्या युद्धासाठी या तोफा अत्यंत उपयुक्त आहेत.

----

No comments:

Post a Comment