Monday 26 November 2018

अटल आरोग्य शिबिर


आरोग्य शिबिरासाठी पूर्वतपासणीला सुरूवात

       नाशिक दि.26- नांदुरी येथे आदिवासी भागातील गरजू रुग्णांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अटल आरोग्य शिबिरासाठी कळवण, बागलाण, देवळा, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या पूर्वतपासणीला सुरूवात करण्यात आली. 600 डॉक्टरांमार्फत ही तपासणी करण्यात येत आहे.

       शिबिराच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेंद्र गिते, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारीनिलेश सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

       बैठकीत रुग्णांची नोंदणी, पूर्वतपासणी, वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, शिबीरातील तपासणी, औषध वितरण, रक्तदान, अवयवदान आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
       पूर्वतपासणीला गती देण्याच्या सुचना देताना श्री.राधाकृष्णन म्हणाले, प्रत्येक गरजू रुग्णाला शिबिराचा लाभ होईल यादृष्टीने ग्रामीण भागात शिबिराविषयी माहिती देण्यात यावी. गरजू रुग्णाला चांगली वैद्यकीय सेवा देण्याची ही संधी असून त्यामुळे प्रशासनाविषयी सकारात्मक भावना निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. पाचही तालुक्यातील लोकप्रतिनिधींना देखील शिबिरासाठी आमंत्रीत करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

       गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला बालविकास अधिकारी यांनी परस्पर समन्वयाद्वारे शिबिराची माहिती या भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन डॉ.गिते यांनी केले.
       श्री.नाईक यांनी रुग्णांच्या पूर्वतपासणीबाबत माहिती दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी गरजू रुग्णांची माहिती घेण्यात येत असून 600 डॉक्टर्स  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात रुग्णांची तपासणी करतील. तपासणीनंतर गरजू रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात येईल. रुग्णांवर शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहे.
-----

No comments:

Post a Comment