Thursday 15 November 2018

दूग्धोत्पादनाने दिलासा


आडवाडीच्या शेतकऱ्यांना दूग्धोत्पादनाने दिला दिलासा

       नाशिक दि.16-सिन्नर तालुक्यात आडवाडी गावात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतीतून फारसे उत्पादन नसताना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेतून गीर गायींसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने वाढलेल्या दुग्धोत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
          सिन्नर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले आडवाडी गाव डोंगरावर वसलेले आहे. संपुर्ण डोंगर परिसरात वाळलेल्या गवताशिवाय काहीच दिसत नाही. गेल्या तीन वर्षापासून पाऊस अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांना पिके जगविणे कठीण होत आहे. पारंपरिक भातपिकही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनातून आपल्या कुटुंबाला सावरले आहे.

          येथील शेतकरी पारंपरिक शेती करताना भात पिक घेतात आणि म्हैस आणि जर्सी गाय पालन करून दुध विक्री करतात. यावर्षी कोरडवाही शेती विकास योजनेतून 40  गीर गायींसाठी प्रत्येकी  20 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे.  गीर गायीचे दुध जर्सीपेक्षा अधिक मिळू लागल्याने शेतकरी पशुपालनाकडे वळू लागले आहेत.

भाऊराव बिन्नर, शेतकरी- पूर्वी जर्सी गायीच्या दुध विक्रीतून दिवसाला केवळ दोनशे ते अडीचशे रुपये मिळत असत. जर्सीला  खुराकही चांगला  लागे. त्यामुळे उत्पन्न जास्त येत नव्हते. गीर गायीमुळे एका दिवसात साडेसातशे पर्यंत उत्पन्न मिळते. गीर गाय रानातही चरून पोट भरू शकते.


         
           गावात कृषी विभागाने या योजनेअंतर्गत आतापर्यंत 40 गायी दिल्या आहेत. गावात 200 लिटरने दुग्धोत्पादन वाढले आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नंदनवैभव शेतकरी गट स्थापन केला असून त्याद्वारे दुग्धजन्य पदार्थाची विक्री होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्यामुळे महिन्याला दोन ते चार हजार रुपये अतिरिक्त लाभ होत आहे. कृषी विभागातर्फे योजनेअंतर्गत मुरघास युनिट, पॅक हाऊस, आणि कंपोस्ट युनिटलाही अनुदान देण्यात येणार आहे.

          निसर्ग कोपला असताना गावात आलेल्या गीर गायींमुळे शेतकऱ्यांना धवल क्रांतीकडे वळण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. सिन्नरच्या बाजारात या गटाने प्रवेश केला आहे. ब्रँडींग आणि पॅकेजिंकचे तंत्र आत्मसात करून उत्पन्न वाढविण्याकडे या शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे. पुढील काळात गीर गायींची संख्या वाढविण्याचा मनोदय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
----

No comments:

Post a Comment