Thursday 29 November 2018

आरोग्य शिबिर


आरोग्य शिबिरासाठी एक लाख रुग्णांची प्राथमिक तपासणी

 नाशिक दि.29 :- पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरी येथे 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अटल ग्रामीण आरोग्य शिबिरासाठी आतपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून 36 हजार रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
          महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठांतर्गत विविध आठ महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. रुग्णांच्या प्राथमिक तपासणीनंतर कळवण, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि बागलाण अशा पाच तालुक्यातील 48 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 ग्रामीण रुग्णालय आणि 2 उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची सविस्तर तपासणी करून त्यांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात येत आहे.

           प्रत्येक तालुक्यात 300 प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. तर आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालात 600 डॉक्टर्सद्वारे तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक  तालुक्यात एक आधुनिक सुविधांनी युक्त दंतवैद्यक फिरते रुग्णालयाची सुविधा करण्यात आली असून दातांचे आजार आणि मुख कर्करोगाविषयी तपासणी करण्यात येत आहे.
          रुग्णांची तपासणी आणि बाहेरून आलेल्या डॉक्टरांची गावातच व्यवस्था करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे आणि आरोग्य यंत्रणेचे चांगले सहकार्य लाभत आहे. शिबिरात 1500 डॉक्टर्स आणि  चार हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून दातांची कवळी, चष्मे, श्रवणयंत्र, अपंगांची उपकरणे, औषधे मोफत देण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-----

No comments:

Post a Comment