Thursday 1 November 2018

‘डीबीटी’ची वर्षपूर्ती


डीबीटीची वर्षपूर्ती कृषी विभागातर्फे साजरी

       नाशिक दि. 1- खतावरील अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्याबाबत योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
          यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणाऱ्या नाशिक तालुका संघासह, खत विक्रेते, -पॉस मशिनचे तंत्रज्ञ, अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी डी.जे. देवरे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जे.आर.पाटील आदी उपस्थित होते.
          उत्पादक ते शेतकऱ्यापर्यंत रासायनिक खत वाटपाच्या संनियंत्रणासाठी नाशिक जिल्ह्याची पथदर्शी जिल्हा म्हणून जून 2016 मध्ये निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात रासायनिक खत परवाना धारकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यात आली.

          एकूण 1328 -पॉस यंत्रांचे वाटप करण्यात आले. 15 डिसेंबर 2016 पासून दीड महिना प्रायोगिक तत्वावर सराव घेतल्यानंतर 2 फेब्रुवारी 2017 पासून ही प्रणाली अस्तित्वात आली. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2017 पासून हा प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविण्यात आला.
          जिल्ह्यात 31 ऑक्टोबरपर्यंत 6 लाख 17 हजार 349 मे.टन. खत ई-पॉस यंत्राद्वारे वितरीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे योग्य दरात व योग्य दर्जाचे खत उपलब्ध होत आहे. आधार कार्डद्वारे खतांचे वितरण होत असल्याने योग्य प्रकारे संनियंत्रण होण्यास मदत होऊन खतांचा काळा बाजार रोखण्यास मदत झाली आहे. भविष्यात जमिनीचा सातबारा उतारा व आरोग्य पत्रिका लींक करण्यात येणार असल्याने शेतकऱ्याला गरजेनुसार पीकास आवश्यक खत पुरवठा करणे सोईचे होणार आहे.
-----

No comments:

Post a Comment