Thursday 22 November 2018

सिटी गॅस प्रकल्प


सिटी गॅस प्रकल्पामुळे स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध- डॉ. सुभाष भामरे

नाशिक दि.22 :  सिटी गॅस प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ, स्वस्त  आणि सुरक्षित इंधनाचा पर्याय नागरीकांना उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.
सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या पायाभरणी आणि दहाव्या सिजीडी बिडींग राऊंडच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, व्यस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर, कार्यकारी संचालक राजीव माथूर आदी उपस्थित होते.

श्री. भामरे म्हणाले, जगासमोर प्रदूषणामुळे हवामान बदलाचे आणि तापमानवाढीचे मोठे संकट उभे आहे. अशावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन हा उत्तम पर्याय आहे. स्वच्छ इंधनाच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईडचे उर्त्सजन 50 टक्क्याने कमी करता येईल. तसेच औद्योगिक व घरगुती वापरासाठी स्वस्त इंधन उपलब्ध होईल.
          स्मार्ट सिटीच्यादृष्टीने स्वच्छ इंधनाची उपलब्धता हा महत्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील 70 टक्के लोकांपर्यंत स्वच्छ आणि स्वस्त इंधन पोहचविता येईल, असे त्यांनी सांगितले. येत्या काही आठवड्यात कोईम्बतूर नंतरच्या देशातील दुसऱ्या डिफेन्स इनोव्हेटीव्ह हबच्या कामाचा नाशिकमध्ये शुभारंभ करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. रावल म्हणाले,  आल्हाददायक पर्यावरण ही नाशिकची मुळ ओळख आहे. ही ओळख टिकविण्यासाठी स्वच्छ उर्जेचा नवा पर्याय उपयुक्त ठरेल. स्वच्छ इंधनामुळे प्रदूषण 50 टक्क्याने कमी होईल. येत्या काळात 125 स्वच्छ  इंधन वितरण केंद्र सुरु होणार असल्याने वाहने सीएनजीवर चालविता येतील. पुढील 20 वर्ष पुरवठा करता येईल एवढ्या स्वच्छ इंधनाची व्यवस्था उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. पांडे म्हणाले, महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. नाशिकमध्ये 1600 कोटीची तर राज्यात पाच हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे त्यामुळे 10 हजार 500 रोजगार उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे राज्याच्या 51 टक्के जनतेपर्यंत स्वच्छ इंधन पोहचविण्यात मदत होईल.
कार्यक्रमाच्या वेळी दिल्लीतील विज्ञान भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.  नवव्या सीजीडी बिडींग अंतर्गत 129 जिल्ह्यातील 65 क्षेत्र तर दहाव्या बिडीग अंतर्गत 124 जिल्ह्यातील 50 क्षेत्रांचा समावेश आहे.
00000

No comments:

Post a Comment