Saturday 10 November 2018

कॅट्स दीक्षांत संचलन


कॅट्सच्या तिसाव्या प्रशिक्षण तुकडीचे दीक्षांत संचलन संपन्न

          नाशिक, 10 : कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन स्कुलच्या एव्हीएटर्स प्रशिक्षण-30 आणि एव्हीएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर प्रशिक्षण-29 चा शानदार दीक्षांत संचलन समारंभ गांधीनगर एअरफिल्ड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात स्कुलचे कमांडंट ब्रिगेडिअर सरबजितसिंग बावा भल्ला यांच्या हस्ते 43 प्रशिक्षणार्थींना एव्हिएशन विंग्ज प्रदान करण्यात आले. तर भारतीय लष्कराच्या दोन आणि नौदलाच्या एका अधिकाऱ्याला एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅच प्रदान करण्यात आले.

          कॅप्टन केशव सिंग यांना अन्य दोन पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीला देण्यात येणारा सिल्व्हर चित्ता चषक प्रदान करण्यात आला. तर मेजर रामदास जोगळेकर यांनादेखील अन्य दोन पुरस्कारांसह मेजर प्रदीप अग्रवाल  स्मृती चषक प्रदान करण्यात आला. कॅप्टन सौरभ शेखर, कॅप्टन अभिमन्यू गणाचार्य, ले.कमांडर अंतर्यामी कुमार यांना प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कृत करण्यात आले.

          यावेळी बोलताना श्री.भल्ला यांनी एव्हिएटर्सना कारवाईसाठी योग्य तयारी, समर्पित वृत्ती आणि क्षमता या तीन पैलूंवर अधिक भर देण्याचे सांगितले. आर्मी एव्हिएशनची गौरवशाली परंपरा पुढे नेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा अधिकाधीक उपयोग करीत उत्तम कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

          यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकात चित्ता, चेतक आणि ध्रुव हेलिकॉप्टर्सनी सहभाग घेतला. अंतर्यामी कुमार यांनी संचलनाचे नेतृत्व केले. ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरने सादर केलेले रोमांचित करणारे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
----

No comments:

Post a Comment