Tuesday 27 November 2018

गोवर रुबेला लसीकरण


पोलिओप्रमाणे गोवर व रुबेला रोगालाही हद्दपार करु या - जिल्हाधिकारी


       नाशिक दि.27- सर्वांच्या सहकार्याने 9 महिने ते 15 वर्षांच्या बालकांना गोवर  आणि रुबेला लसीकरण करुन पोलिओप्रमाणे या रोगास हद्दपार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
          जिल्हा रुग्णालय येथे आयोजित गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आरोग्य उपसंचालक डॉ.रत्ना राखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ.कमलाकर लष्करे उपस्थित होते.

          श्री.राधाकृष्णन म्हणाले, गोवर रुबेलाचे लसीकरण करणे सर्व पालकांना परिस्थितीनुसार शक्य होत नव्हते. परंतु शासनामार्फत राबवण्यिात येणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून सर्व बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.  या दोन्ही आजारामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीवर परिणाम होत असल्याने त्यातून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांना लस देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

          डॉ.गिते म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक असून बालमृत्यू कमी करण्यासाठी मोहिमेचा निश्चित उपयोग होणार आहे. भविष्यात एकही मुलाला येऊ नये किंवा बालमृत्यू होऊ नये यासाठी सर्वांनी मिळून मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

          जिल्ह्यातून एकूण 21 लाख मुलांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जगदाळे यांनी दिली
          यावेळी बालकांना अंगठ्यावर शाई लाऊन व प्रमाणपत्र देऊन मोहिमेचे व कोल्ड चेनचे (लसीकरण वाहतूक ) उद्घाटन करण्यात आले.

तळेगाव येथे मोहिमेचा शुभारंभ

ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितलताई सांगळे यांचे हस्ते दिंडोरी तालुक्यात तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला.
श्रीमती सांगळे म्हणाल्या, आरोग्य विभागाने लसीकरणद्वारे देशातून पोलिओचे उच्चाटन केले आहे. त्याप्रमाणे पालकांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिल्यास या आजाराच्या दुष्परिणामापासून बालकांना वाचविता येईल. जिल्ह्यातील मातांनी मुलांच्या  लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


डॉ. गीते म्हणाले, शिक्षक  आणि पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील  आणि गावातील मुला-मुलींना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. गोवर रूबेला मोहीमेमध्ये आपल्याला शंभर टक्के मुलांचे लसीकरण करावयाचे आहे यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्य करावे, आवाहन त्यांनी यावेळी  केले.
************

No comments:

Post a Comment