Friday 16 November 2018

अटल महाआरोग्य शिबीर

गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य शिबीराची माहिती पोहोचवा- जिल्हाधिकारी

       नाशिक, दि.16- नांदुरी येथे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी  2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या अटल महाआरोग्य शिबीराची माहिती कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, आणि दिंडोरी तालुक्यातील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
          कळवण पंचायत समितीच्या सभागृहात शिबीराच्या पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उप विभागीय अधिकारी पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक आणि संदीप जाधव आदी उपस्थित होते.
          श्री. राधाकृष्णन म्हणाले, 20  नोव्हेंबरपासून रुग्णांची पूर्व तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात करण्यात येणार आहे. तसेच 25 नोव्हेंबर पासून प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. नाशिक येथे झालेल्या शिबीरात दुर्गम आदिवासी भागातील रुग्ण येऊ शकले नाहीत, त्यांना नामांकित डॉक्टरांमार्फत उपचाराची चांगली संधी शिबीरात उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक रुग्णांना शिबीराचा लाभ व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          खासदार चव्हाण म्हणाले, कळवणसारख्या आदिवासी भागात प्रथमच अशा स्वरुपाचे शिबीर होत आहे. शिबीरात पूर्वतपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया अशा तीनही सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्व घटकाच्या सहकार्याने सेवाभावनेने शिबीर यशस्वी होईल असे प्रयत्न करावेत.
          डॉ. आहेर म्हणाले, राज्यातील नामांकित डॉक्टर शिबीरात येत असल्याने रुग्णांना त्याचा चांगला लाभ होणार आहे. ज्या रुग्णांना शासकीय योजनांतर्गत उपचार मिळू शकत नाही अशा रुग्णांनादेखिल विविध संस्थांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि उपचाराची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शिबीराची माहिती पाचही तालुक्यातील जनतेपर्यंत व्यापकरितीने पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
          श्री.गिते म्हणाले, शिबीराबाबत ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देण्यात यावा. गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून शिबीराची माहिती द्यावी.
          श्री. नाईक यांनी शिबीराच्या नियोजनाबाबत माहिती दिली. शिबीरासाठी विविध घटकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. पूर्व तपासणी नंतर 2 डिसेंबर रोजी नामांकित डॉक्टर्स रुग्णांना तपासतील आणि 3 तारखेपासून आवश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार करतील. ज्या रुग्णांवर शासकीय योजनांतर्गत उपचार करता येणार नाही त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि विविध संस्थाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. पूर्वतपासणीसाठी 350 डॉक्टर्सची सेवा घेण्यात येणार आहे. तसेच 200 कर्मचारी घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. आरोग्य शिबीरासाठी 1500 डॉक्टरांची सेवा उपलबध होणार असून शिबीराच्या माध्यमातून कृत्रिम अवयव, कर्णयंत्र, चष्मे, औषधे, विविध उपकरणे मोफत देण्यात येणार आहे. राज्यातील हे 153 वे आरोग्य शिबीर असून मोठ्या स्वरुपाचे 32 शिबीरांचे आयोजन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
          नाशिक येथे झालेल्या आरोग्य शिबीरांतर्गत आत्तापर्यंत 29 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आलेले आहेत अशी माहिती श्री.जाधव यांनी दिली. बैठकीला पाचही तालुक्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
                                                             0000

No comments:

Post a Comment