Tuesday 13 November 2018

शिवाररस्ता मोकळा


अंतरवेली गावात शिवाररस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना फायदा

       नाशिक दि.13-निफाड तालुक्यात अंतरवेली गावात महाराजस्व अभियानांतर्गत दोन किलोमीटर लांबीचा शिवाररस्ता मोकळा झाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तालुक्यात 12 गावातील अनेक वर्षे वादात असलेले पाणंद रस्ते आणि शिवार रस्ते सामोपचाराने मोकळे करण्यात आले आहेत.
          अंतरवेली आणि जऊळके गावाला जोडणाऱ्या या भागातून सरस्वती नदीचे पात्र जाते. काही  शेतकरी नदीलगत शेती करत असल्याने हा रस्ता अदृष्य झाला होता. शिवारातील 60 ते 70 शेतकऱ्यांना त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असे. मंडळ अधिकारी एस..शेख यांना पुढाकार घेऊन शिवार रस्ता मोकळा करण्यासाठी सामोपचाराने मार्ग काढण्यात यश आले.

           दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आता मोकळा झाला आहे. रस्त्यावरून ट्रॅक्टर, पीकअपची ये-जा सुरू झाली आहे. खते बांधापर्यंत येतात आणि शेतमाल थेट बांधावरून बाजारात जातो. मुलांना शाळेत जाण्यासाठी  चांगली सोय झाली आहे.

           शिवारात आता द्राक्षबागा आणि भाजीपाला पिके उभी राहिलेली दिसतात. टोमॅटोने भरलेली वाहने रस्त्यावरून दिमाखात जाताना दिसतात. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत: वर्गणी एकत्रित करून रस्त्याचे काम केले. रस्ता आणखी मजबूत करण्यासाठीदेखील प्रत्येकजण आपला वाटा उचलायला तयार आहे. रस्त्याच्या निमित्ताने शेतकरी एकत्र आले. गावात जलयुक्त शिवार अभियानही यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातील 12 गावात 20-25 वर्षे जुने वाद असलेले रस्ते महाराजस्व अभियानांतर्गत सामोपचाराने मोकळे करण्यात प्रशासनाला यश आले आहे. यात दारणा सावंगी येथील अभिलेखीत रस्ता, शिरवाडेवणी ते पालखेड शिवरस्ता, धारणगाव वीर ते सारोळेथडी, रसलपूर ते कोठूरे, नारायणटेंभी ते कारसुळ, वडाळी  नजीक ते पिंप्री, सोनगाव ते सायखेडा, खडकमाळेगाव ते टाकळी, दारणासांगवी आणि पालखेड शिवरस्त्याचा समावेश आहे. तयार झालेले शिवार रस्ते, पाणंद रस्ते गावाच्या प्रगतीचे मार्ग ठरत आहेत.


         
महेश पाटील, उपविभागीय अधिकारी-निफाड तालुक्यात महाराजस्व अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साधारण 15 किलोमीटर  लांबीचे पाणंद, शिवरस्ते आणि शिवाररस्ते मोकळे करण्यात आले आहेत. त्याचा दोन हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.


No comments:

Post a Comment