Tuesday 27 February 2018

मराठी भाषा गौरव दिन


विविध विषयांवर मराठीतून साहित्यनिर्मीती होणे आवश्यक - झगडे



नाशिक दि. 27: मराठी भाषेच्या प्रगल्भतेसाठी  आणि संवर्धनासाठी विविध विषयांवरील साहित्यनिर्मीती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त जोतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, प्र.माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार एस. डी. मोहिते आदी उपस्थित होते.
 श्री. झगडे म्हणाले, मराठी भाषेत लवचिकता आहे. काळानुसार मराठी भाषेच्या स्वरुपात आणि उपयोगत बदल झाले. भाषेत होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळापासून असलेली मराठी भाषेची वैभवशाली परंपरा लक्षात घेता तिच्या विकासाबाबत भिती बाळगण्याचे कारण नाही. इतर भाषिकांमध्ये मराठी साहित्य पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कुसुमाग्रजांच्या कविततेत जीवनाचे तत्वज्ञान सामावले आहे. त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या विकासाबाबत चर्चा व्हावी यासाठी शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात येते, असेही श्री.झगडे यांनी सांगितले. समाजमाध्यमात मराठीचे प्रमाण वाढत असून मराठी साहित्याची श्रीमंती  लक्षात घेता  येत्या काळात मराठी भाषा महाजालावर अधिक विकसीत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुसुमाग्रजांच्या कवितेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय-   किशोर पाठक

          कुसुमाग्रजांच्या कविततेत निसर्ग आणि जीवन यांचा सुंदर समन्वय आहे. त्यांनी प्रेमाची कविता लिहिताना जगण्याची शिकवण दिली आणि माणूसकीचा धागा सोडला नाही, असे प्रतिपादन कवी किशोर पाठक यांनी यावेळी केले.
 इंग्रजी भाषा जगाचे ज्ञान मिळवण्यासाठी असणारी खिडकी असली तरी जीवनाचे ज्ञान मिळवण्याचे मराठी भाषा हे मुख्य दार  आहे.  मराठी भाषा मातीशी आणि मनाशी जोडली गेलेली भाषा आहे. मराठी साहित्य ही  प्रकाशकिरणे आहेत. ती जीवनातून नष्ट झाली तर जीवन निरर्थक होईल. म्हणून मराठी भाषा बोलण्याचा आग्रह सर्वांनी धरावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुसुमाग्रजांच्या सहवासाने चैतन्याचा अनुभव मिळायचा अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करतांना  त्यांनी कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रजांनी आपल्या जीवनात कायम मराठी भाषा आणि माणसाला जपले,असेही ते म्हणाले.

          श्री. स्वामी म्हणाले, स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेसोबत मराठी भाषा ही देखील अत्यंत महत्वाची आहे. मराठी भाषेचा व्यवहारात योग्य वापर होण्यासाठी  वाचनसंस्कृती विकसीत होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. संत साहित्यात आणि आधुनिक कवींनीदेखील मराठी भाषेची थोरवी गायली असल्याचे सांगून मराठी भाषेचे महत्व विविध स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनातर्फे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.मोघे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले.  तहसिलदार एस.डी. मोहिते यांनी आभर व्यक्त केले.
पुस्तकांचे प्रदर्शन कौतुकास्पद उपक्रम-   विभागीय आयुक्त

           मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिक विभागीय माहिती कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकराज्य आणि मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. प्रदर्शनात असलेले दुर्मिळ लोकराज्य अंक संग्राह्य आणि उपयुक्त असून प्रदर्शनचा उपक्रम कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

 यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, सुखदेव बनकर, प्रविण पुरी, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे, पी.बी. वाघमोडे, उन्मेष महाजन, तहसिलदार श्रीमती एस. डी. मोहिते, सहायक संचालक अर्चना देशमुख यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment