Wednesday 21 February 2018

जिल्हा कृषी महोत्सव

  शेतकऱ्यांना प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज -महेश झगडे

          नाशिक,  दि 21 : कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा देताना त्यांना अन्न प्रक्रीया उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

 महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आत्माचे संचालक सुभाष खेमनर,  कृषि सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते.

श्री.झगडे म्हणाले, प्रक्रीया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकत्रित येऊन त्यावर प्रक्रीया करावी. देशात केवळ तीन टक्के शेतमालावर प्रक्रीया होत असून हे प्रमाण वाढविण्यासाठी कृषि विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांची मानसिकता तयार करावी लागेल. प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात शेतमालावर प्रक्रीयेचे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांच्या यशस्वी प्रयोगाची देवाणघेवाण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केवळ शेतमालाच्या विक्रीचे उद्दीष्ट न ठेवता बाजारपेठेची व्याप्ती वाढविण्यासाठी  प्रदर्शनाचा उपयोग व्हावा. त्यासाठी मुंबईच्या घाऊक विक्रेत्यांना बोलावून त्यांना कोणत्या कालावधीत शेतमालची गरज असते याची माहिती शेतकऱ्यांना करून द्यावी. अन्न प्रक्रीया उद्योगांच्या खरेदी अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांचे करार करण्याचा प्रयत्न  कृषि महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात यावा, अशी सुचना त्यांनी केली.

नाशिक शेतीच्या संदर्भात देशातील सर्वात प्रगत जिल्हा असल्याचे सांगून तंत्रशुद्ध शेतीसाठी आवश्यक मानसिकता आणि प्रयोगशिलता  शेतकऱ्यांमध्ये असल्याचे श्री.झगडे म्हणाले. कृषि विभागाने चांगली कामगिरी केली असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त  लाभाचा विचार करावा यादृष्टीने त्यांची मानसिकता विकसीत करण्याचे काम कृषि विभागाने करावे, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती सांगळे यांनी महिला बचतगटामार्फत कृषि क्षेत्रात चांगले काम होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक असून शेतमालाचे वैशिष्ट्य प्रभाविपणे ग्राहकापर्यंत पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.

श्रीमती फरांदे यांनी सेंद्रीय उत्पादनाचे ब्रँडींग आवश्यक असल्याचे सांगितले. सेंद्रीय उत्पादनामुळे जमिनीची उत्पादकता टिकून राहाते. आरोग्याबाबत जनता जागरूक होत असल्याने सेंद्रीय शेतीसाठी नियोजन आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमती हिरे यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.झिरवाळ यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केलेप्रदर्शनातून नैसर्गिक उत्पादने खरेदी करण्याची नागरिकांना चांगली संधी असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी श्री.गिते यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

श्री.खेमनर म्हणाले,राज्यात आत्माच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 12 शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहेत. राज्यात मार्च अखेरपर्यंत 40 कंपन्या स्थापन होतील. आत्माच्या माध्यमातून विपणन आणि प्रक्रीया उद्योगावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक श्री.कांबळे यांनी केले. शेतकरी गटाची क्षमता बांधणी आणि शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपविभागीय कृषि अधिकारी कैलास खैरनार यांनी लिहिलेल्याकिडनाशके-ओळख व हाताळणी’  या पुस्तकाचे आणि कृषि विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या यशकथेवर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते शेती क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना आणि शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार विजेते शेतकरी गट-मल्‍हारी बाबा स्वयंसहाय्यता शेतमाल शेतकरी बचतगट, भगुर ता.नाशिक , भक्तराज जटायू सेंद्रीय शेतमाल उत्पादक गट, बांबळेवाडी ता.इगतुपरी, श्री श्री सेंद्री फळे व भाजीपाला उत्पादक गट, उगांव ता.निफाड, संपूर्णा सेंद्रीय शेतमाल संलग्न उत्पादन व विक्री शेतकरी गट, जोपुळ ता.चांदवड, पार्वती कृषि विज्ञान मंडळ, कातरणी ता.येवला, देवनदी व्हॅली ॲग्री प्रोड्यूसर कंपनी, लोणारवाडी ता.सिन्नर, शेतकरी महिला बचत गट, कणकापूर ता.देवळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता शेतकरी बचतगट,तळेगांववणी ता.दिंडोरी, श्री श्री सेंद्रीय शेतीमाल उत्पादक व विक्री बचत गट हातरुडी ता.सुरगाणा, गंगापूत्र सेंद्रीय शेती शेतकरी गट, पिंपळगाव ता.मालेगाव, श्री स्वामी समर्थ सेंद्रीय शेतमाल उत्पादक गट, ताहाराबाद, ता.सटाणा
पुरस्कार विजेते शेतकरी- संध्या बस्ते, झारवड ता.त्र्यंबकेश्वर, संतोष मुरलीधर देशमुख, पाळे ता.कळवण, गणेश लवाकुंश जाधव, हरणगाव ता.पेठ. आदर्श शेतकरी पुरस्कार- बबन कारभारी शिंदे, अस्तगांव ता.नांदगाव,
कृषि महोत्सवात सेंद्रीय उत्पादने खरेदी करण्याची संधी

       नाशिक जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या कृषि महोत्सावात 236 स्टॉलची उभारणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी बचत गटांनी सहभाग घेतला असून सेंद्रीय भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य खरेदी करण्याची संधी नागरिकांना आहे.         यासोबत शेती क्षेत्रातीन नवे तंत्रज्ञान, शेतमालावर प्रक्रीया करून तयार करण्यात आलेले विविध पदार्थ, शेतीची अवजारे व किटनाशके आदींची दालने प्रदर्शनात आहेत. सोबतच आत्मा आणि कृषी विभागाच्यावतीने विविध योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागातर्फे शेततळ्यातील मत्स्यपालनाची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटात मोठ्या क्षेत्रावर फवारणी करणारे ड्रोन यंत्र आणि  जमिनीतील ओलावा तसेच हवामानातील बदल दर्शविणारे यंत्र प्रदर्शनातील खास आकर्षण आहे.

          ठिबक सिंचन तसेच शेडनेट मध्ये नवनवीन बदल काही दालनांच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. सोलर पॅनलमध्ये वाफवलेल्या भाज्या, रेशीम किड्यांपासून रेशीम उत्पादन असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल या ठिकाणी आहेत. सोबतच खवय्यांना अस्सल पारंपरिक चव खाद्य स्टॉल्सच्या माध्यमातून चाखता येणार आहे. प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहाणार आहे.

----

No comments:

Post a Comment