Friday 23 February 2018

कृषि प्रदर्शन

प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

नाशिक दि. 23- कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विविध प्रकारच्या जोड व्यवसायाची माहिती देण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशिल आहेत. त्यामुळे प्रदर्शनातील नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यात दिसत आहे. विविध दालनांना भेट देताना संबंधितांना प्रश्न विचारून माहिती जाणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.

 प्रदर्शनातील ‘बायोनिक स्क्रिक्रो’ हे उपकरण तयार करुन हवामानात होणारे बदल, पर्जन्याची माहिती याची अचुक माहिती मोबाईलच्या माध्यमातुन देते. त्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञानदेखील शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे.  एक ड्रोन माती परीक्षण करुन जमिनीतील आर्द्रता, येणारे पीक, याबद्दल सखोल माहिती देते. शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणारा कालावधी दुसऱ्या प्रकारच्या ड्रोनमुळे कमी होते. हा ड्रोन दिड ते दोन एकर शेती दहा मिनिटात फवारणी करतो.
शेतातील विहीरीमधील विद्युत मोटारीसाठी असणारे ‘ॲग्रोमेशन मोबाईल ऑटो’ या उपकरणात जगातून कुठूनही मिस्ड कॉल, मेसेज आणि दुरध्वनीद्वारे नियंत्रण ठेवुन मोटार चालू- बंद करता येते. तसेच आपण मोबाईलवर तयार केलेल्या वेळापत्रकानुसारदेखील उपकरणाचा वापर करु शकतो.

एक्सपेंडेड क्ले ॲग्रीगेट नावाची माती प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. इतर मातीपेक्षा या मातीचे वजन 70 टक्के कमी असते. यामध्ये 12 प्रकारची जैविक तत्व असल्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर होत असतो. या मातीचा उपयोग बागकामासाठी  मोठ्या प्रमाणात केला जातो.
 किटक व पशु, पक्ष्यापासुन धोका लक्षात घेता केळी, टरबुज, टोमॅटो, पपई, द्राक्ष, डाळींब पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’  प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. विविध प्रकारची किटकनाशके, वनस्पतीपासून तयार होणाऱ्या वस्तू, ट्रॅक्टर्स, अवजारे , रोपवाटिकांमधील नवे तंत्र आदी प्रदर्शनात पहायला मिळते. शेततळ्यातील मत्स्यव्यवसायाबाबत प्रदर्शनात स्वतंत्र दालनाद्वारे माहिती देण्यात येत आहे.

----

No comments:

Post a Comment