Thursday 22 February 2018

खरेदीदार-विक्रेता संमेलन

नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
खरेदीदार-विक्रेता संमेलनास चांगला प्रतिसाद

नाशिक, 22 : जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी बचतगट आणि शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य दर मिळावा तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा कृषि महोत्सवांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
           संमेलनाच्या माध्यमातुन उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. विविध उद्योगसमुह, निर्यातदार, परदेशी कंपन्या असे 25 खरेदीदार उप‍स्थित होते. त्यामध्ये बिग बाझार, गोंगळ प्रोसेसिंग कंपनी, युनिक ॲग्रीकल्चर, फिल्डफ्रेश ॲग्रीकल्चर, टेक्निकल झोन, स्केलर ट्रेडिंग कंपनी, स्टार ॲग्री बाझार, केपरी कॉर्न आदींचा यात सहभाग होता

          सत्राच्या सुरुवातीस विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. यांमध्ये शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी निर्यातदारांची आर्थिक बाजू लक्षात घेणे, गतवर्षीच्या आयात निर्यातची आकडेवारी तपासुन माल देणे. आर्थिक व्यवसायात पारदर्शकता यावी म्हणुन करार पद्धतीचा अवलंब करणे आदी सुचना उपस्थित तज्ज्ञांनी  मांडल्या.  प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तरे देण्यात आली.

          औपचारीक सत्रानंतर द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची, पॅकेजिंग विषयाशी संबंधित शेतकरी आणि खरेदीदारांची  समोरासमोर चर्चा ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी समक्ष चर्चा करून माहिती घेतली.
          सत्राचा समारोप करतांना आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या खरेदीदाराची माहिती घेऊन मालाची विक्री कराताना कायदेशीर करार करावा, असे सांगितले. खरेदीदारांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी शेतकऱ्याना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गेल्यावर्षी त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा भागातून एक हजार मे.टन आंब्याचे संकलन करण्यात आले होते, अशी माहिती  त्यांनी  दिली.

कृषि प्रदर्शनात सेंद्रीय उत्पादनांना मागणी

 महिला बचतगट आणि शेतकरी गटांनी अनेक कृषिपुरक वस्तूंची निर्मिती करुन जिल्हा कृषि महोत्सव प्रदर्शनातील विविध दालनात मांडल्या आहेत. या प्रदर्शनात सेंद्रीय कृषि उत्पादनांना चांगली मागणी आहे.
 प्रदर्शनात एकुण सहा भव्य दालने उभारलेली असून त्यामध्ये धान्य, सेंद्रिय शेती, खाद्य, औजारे व मशिनरी, गृहोपयोगी वस्तू, सिंचन साधने व तंत्रज्ञान, कृषि व संलग्न विभाग आणि इतर शासकीय विभागांचा समावेश आहे.

सेंद्रीय फळे, भाजीपाला, धान्य आदी उपत्पादनांना ग्राहकांची विशेष मागणी आहे. विशेषत: सेंद्रीय द्राक्षे आणि सुरगाणा तालुक्यातील स्ट्रॉबेरीला चांगली मागणी आहे. सोबत ॲपल बोर, पेरु, सोलर ड्रायरच्या सहाय्याने वाफवलेल्या तसेच सहा महिन्यात कधीही खावु शकणारे सोळा प्रकारच्या फळभाज्या, तेलात शिजवलेली अळिंबी, काकवी , सेंद्रिय गुळ, डाळ, मूग, शेंगा आदी उत्पादनांकडे ग्राहकांचा ओढा अधिक आहे.

खाद्य दालनात विविध बचतगटांनी स्टॉल मांडले त्यामध्ये वसुंधरा महिला बचत गटाने ठेवलेले चुलीवरचे मांडे, बाजरीचे भाकरी पिठले ठेचा हे ग्राहकांसाठी आकर्षण ठरले आहे.  तसेच पापड लोणचे, फ्रूट जॅम, आवळा कॅन्डी, कुल्फी आदी पदार्थांसोबत नागलीच्या भाकरी, ठेचा आदी पदार्थ खवय्यांसाठी विशेष आकर्षण आहे. प्रदर्शन शुक्रवारपासून सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

---

No comments:

Post a Comment