Sunday 25 February 2018

कार्यक्षम आमदार पुरस्कार


‘सावाना’च्या पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल-गिरीष महाजन

नाशिक 25 : सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रदान करण्यात आलेल्या माजी आमदार  कै.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.महाजन यांचा पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अभिजित बगदे, सचिव श्रीकांत बेणी, संपादक शैलेद्र तनपुरे, भानुदास शौचे आदी उपस्थित होते.

 श्री.महाजन म्हणाले, विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. याठिकाणी वंचितांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गरिबांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावा याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना व्यक्तिगत प्रतिष्ठेपेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यात जास्त समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहर संस्कृतिचे माहेरघर असल्याचा उल्लेख करून सार्वजनिक वाचनालय हा सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारा शहराचा मानबिंदू आहे, अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. वाचनालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार कोणी दिला आणि कोणाच्या हातून मिळाला याला महत्व असल्याचे नमूद करून  डॉ.बंग यांच्यासारख्या नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या  सेवाभावी व्यक्तीच्या हातून पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

पुरस्कारासाठी करण्यात आलेली श्री.महाजन यांची ओळख योग्‍य असल्याचा उल्लेख करीत डॉ. बंग म्हणाले, पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि त्या व्यक्तिचे चारित्र्य कसे आहे यावरून पुरस्काराची उंची ठरते. सावानातर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार कर्तबगार व्यक्तिंना देण्यात आल्याने त्याला विशेष महत्व आहे. श्री.महाजन स्वस्थ जीवनशैलीचे आदर्श असल्याने    तसेच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड योग्य असल्याचे , त्यांनी सांगितले.
आरोग्याचे विविध प्रश्न समोर येत असताना निरोगी जीवनशैलीचा वापर दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. रोगनिर्मितीच्या नव्या कारणांचे समाजातून उच्चाटन होणे आवश्यक असून त्यासाठी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.बेणी यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलाखतीतून प्रकटले जीवनातील विविध पैलू

तत्पूर्वी श्री.महाजन यांची त्यांचे मित्र एम.एम.पाटील आणि संपादक श्रीमंत माने यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना पालकमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
नाशिकला सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्याची वैभवशाली परंपरा असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पद भुषवितांना विशेष समाधान मिळते असे त्यांनी सांगितले.
एका कौटुंबिक प्रश्नाला उत्तर देताना मुलगा-मुलगी असा भेद करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या वागणुकीमुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या माता-पित्यांच्या व्यथा मांडतांना ते काहीसे भावूकही झाले. आपली संस्कृती भेदाची नसल्याने असा लिंगभेद चुकीचा असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या कामाविषयी बोलताना शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना वीज आणि पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राच्या सहाय्याने सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी अधिक निधी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनाकडे वळवावे लागेल,असेही ते म्हणाले.
श्री.महाजन यांनी आपला स्वभाव, राजकीय कारकिर्द, कुटुंबातील संस्कार याविषयी विचारलेल्या प्रश्नांना तेवढ्याच दिलखुलासपणे उत्तरे दिली. कुंभमेळ्याचे जनतेच्या सहकार्याने झालेले यशस्वी आयोजन विशेष समाधन देणारे होते, असेही ते म्हणाले.
----

No comments:

Post a Comment