Thursday 15 February 2018

विकासकामांचा शुभारंभ

 पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला निवारा देण्यासाठी कटिबद्ध
                                          - डॉ. रणजित पाटील

नाशिक, दि.15 :- राज्यातील दोन लाखपेक्षा जास्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस कामाच्या ठिकाणी चांगली निवासाची सुविधा देण्यास शासन कटीबद्ध असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे), नगरविकास, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील  यांनी केले.
          वासननगर पोलीस वसाहतीमधील विविध कामांचा शुभारंभ त्यांचे हस्ते झाला याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलिस  उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, विजय मगर, नगरसेवक भगवान दोंदे, प्रियांका घाटे, पुष्पाताई आव्हाड, एकनाथ नवले आदी उपस्थित होते.

          गृहराज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, पोलीस वसाहतीच्या सुधारणांसाठी शासनाचे धोरण क्रांतीकारक आहे. सर्व सोईंनीयुक्त घर देण्याच्यादृष्टीने शासनाने निर्णय घेतले आहेत. या विभागाच्या जागांच्या विकसनासाठी अडीच एफ.एस.आय. देऊन कामाच्या ठिकाणी हक्काचा निवारा देण्यासाठी उपाय केले जात आहेत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना व गृहिणींना समाधान मिळेल अशा सोईसुविधा निर्माण करण्यात येतील, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

          नाशिक शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पेलिकन पार्क, पाथर्डी भागात नाट्यगृह उभारणे आदी प्रकल्पांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. पोलिस वसाहतीमधील सुधारणांसाठी पोलिस आयुक्त, आमदार यांच्यावतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
          आमदार श्रीमती हिरे यांनी पोलिस वसाहती मध्ये सुशोभिकरण, पिण्याचे पाणी आदी चांगल्या सुविधांसाठी  करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची  माहिती दिली.
                                                ००००

No comments:

Post a Comment