Monday 19 February 2018

शिवजन्मोत्सव सोहळा

‍छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा-गिरीष महाजन

          नाशिक, दि. 19 :- छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारचे भेद बाजूला सारून रयतेला सुखी ठेवण्याचे कार्य केले. देशाला वैभवशाली करण्यासाठी शिवरायांचा हा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व  लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          नाशिकरोड येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते. त्यांचे कार्य केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहे. रयतेचा राजा, जाणता राजा, प्रजाहितदक्ष राजा कसा असावा हे याचा आदर्श त्यांनी कार्यातून आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांनी जनकल्याणाच्या भूमीकेतून सर्वधर्मियांना न्याय देण्याचे कार्य केले. बलशाली राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचे कार्य प्रेरक आहे, असे त्यांनी सांगितले. युवकांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

          श्री.महाजन यांनी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाशेजारील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे आयोजित शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालकमंत्र्यांनी पालखी पुजन केले. पालखी सोहळ्याचा शुभारंभ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.भामरे यांच्या हस्ते गोल्फ क्लब येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, अपूर्व हिरे आदी उपस्थित होते.

          छत्रपती शिवरायांची युद्धनिती, गनिमी कावा हे युद्धशास्त्रासाठी महत्वाचे आहे. संरक्षण सिद्धतेविषयी त्यांची दुरदृष्टी आधुनिक काळातही मार्गदर्शक आहे, असे डॉ.भामरे यांनी यावेळी सांगितले.


          पालखी सोहळ्यात विविध संस्था, महाविद्यालयांच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री महाजन यांनी मिरवणूकीदरम्यान लेझीम खेळात सहभागी होत शाळकरी मुलांचा उत्साह वाढविला. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिवजयंती कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.    ----

No comments:

Post a Comment