Wednesday 14 February 2018

समृद्धी महामार्ग बैठक

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनचसमृद्धीप्रकल्प पुढे नेणार
                                             -एकनाथ शिंदे


          नाशिक, दि. 14 :- शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच समृद्धी महामार्गाचे काम पुढे नेण्यात येईल, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय महामार्गासाठी जमीन घेण्यात येणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
          शासकीय विश्रामगृह येथे समृद्धी महामार्गाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अपर जिल्हाधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.

          श्री.शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग राज्य आणि देशासाठी महत्वाचा आहे. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेऊन महामार्गाचे काम करण्यात येत आहे. इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या उच्चाधिकार समितीसमोर ठेवण्यात येऊन शासन त्याबाबत गांभिर्याने विचार करेल, असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी प्रकल्पात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

          ते म्हणाले,समृद्धी महामार्गामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या लाभ होणार आहे. राज्याच्यादृष्टीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही या भूमिकेतून महामार्गाचे काम पुढे नेण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे महामार्गमुळे बाधीत होणाऱ्या विहीरी वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

          श्री.शिंदे यांनी शिवडे ग्रामस्थांशी तसेच इगतपुरी आणि सिन्नर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातर्फे सकारात्मक भूमिका घेण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.
          समृद्धी महामार्गाबाबत ग्रामस्थांना असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि महामार्गाचे काम पुढे नेताना प्रत्येकाचे हित  लक्षात घेतले जाईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन म्हणाले.

-----

No comments:

Post a Comment