Saturday 24 February 2018

कृषि प्रदर्शन

प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती

नाशिक दि. 23- कृषि महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. आत्मा, कृषि, रेशिम उद्योग आणि मत्स्य व्यवसायच्या दालनाला अधिक प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरी विविध योजनांविषयी माहिती घेताना दिसत आहेत.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय यांनी बागायती शेती करताना शेततळ्यात कटला, रोहू, सिप्रिंन्स माशांचे उत्पादन आणि माशांचा खत म्हणून कसा वापर करता येईल याविषयी माहिती प्रदर्शित केली आहे. याठिकाणी लहान ड्रममध्ये मासे सोडलेले असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.

जिल्हा रेशीम कार्यालयाने रेशीम किटकांपासून शाश्वत शेतीची माहिती प्रदर्शित केली आहे. तुती बागेस किटकनाशक आणि बुरशीनाशकांचा उपयोग करावा लागत नाही. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर 15 वर्ष लागवड करावी लागत नाही. अशी उपयुक्त माहिती देताना शाश्वत शेतीचे महत्व विविध प्रतिकृतींद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहे.

कृषि विभागाने जलुयक्त शिवार अभियानासह विविध योजनांची माहिती प्रदर्शित केली आहे. तर आत्माच्या दालनाद्वारे सेंद्रीय शेती, प्रशिक्षण, क्षेत्रभेटी, परंपरागत कृषी विकास, गांडुळ खत निर्मिती, उत्पादकता वाढ आदींची माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना पतपुरवठ्याची माहिती विविध बँकांच्या दालनातून देण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, जिल्हा कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळ, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण आदी विविध दालनांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
----

No comments:

Post a Comment