Sunday 18 February 2018

नाशिक मॅरेथॉन

चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करा-गिरीष महाजन

          नाशिक, दि. 18 :- नाशिक मॅरेथॉनच्या निमित्ताने शहरात आरोग्याचा कुंभमेळा साजरा होत असून चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम करा, असा संदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिला.
          गोल्फ क्लब मैदान येथे आयोजितनाशिक मॅरेथॉन 2018’च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस.जगन्नाथन, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपसंचालक नंदकुमार ठाकुर,  चिन्मय उद्गीरकर, संयमी खेर आणि विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.

          पालकमंत्री म्हणाले, चांगल्या आरोग्यासाठीदेखील दररोज धावण्याची सवय महत्वाची आहे. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी आणि सशक्त पिढी घडविता येईल. मॅरेथॉनमध्ये सर्व धर्मातील आणि वयोगटातील नागरिकांचा सहभाग असल्याने सामाजिक सलोख्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचेल. तसेच स्वच्छ आणि सुंदर नाशिक सोबतच आरोग्यदायी शहर नाशिक अशी ओळख प्रस्थापित होण्यासाठी चांगले वातावरण तयार होईल, असे त्यांनी सांगितले. मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढीलवर्षीदेखील असेच आयोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.

          नाशिक मॅरेथॉन 2018 अंतर्गत 42 किलोमीटर, 21 किमी, 10 किमी, 5 किमी, 3 किमी आणि 3 किमी (ज्येष्ठ नागरीक) अशा विविध गटातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आबालवृद्धांचा उत्स्फुर्त सहभाग हे मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले. सुमारे 20 ते 25 हजार नागरिकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

सामाजिक ऐक्य आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देणाऱ्या रॅलीचेही याप्रसंगी आयोजन करण्यात आले. पालकमंत्री महाजन यांनी रॅलीचा आणि मॅरेथॉनचा शुभारंभ केला. त्यांनी  स्वत: धावपटूच्या वेशात 5 किलोमीटरची स्पर्धा पुर्ण करताना इतरही स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

          स्पर्धेदरम्यान ढोल पथक आणि पंजाबी भांगडा नृत्य सादर करणारे पथक मॅरेथॉनमध्ये सहभागी नागरिकांचा उत्साह वाढवित होते. मुख्य मंचावर सामाजिक सलोख्याचा संदेश देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते 91 वर्षीय स्मृती विश्वास यांचा स्मृतिचिन्ह आणि 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बालविकास सचिव विनीता सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन, पोलीस आयुक्त सिंगल, पोलीस अधीक्षक दराडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

---

No comments:

Post a Comment