Monday 12 February 2018

अधिकाऱ्यांशी संवाद

रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने तातडीने दुरुस्ती शक्य-चंद्रकांत पाटील


          नाशिक दि.12- रस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या निधीसाठी भरीव तरतूद केल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करणे  आणि  त्याचा दर्जा चांगला उत्तम राखणे शक्य झाले, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
          सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार जे.पी.गावीत, मुख्य अभियंता ए.एस.पगारे, अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील आदी उपस्थित होते.

          श्री.पाटील म्हणाले, खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी एकूण तरतूद 2800 कोटीहून सात हजार कोटी करण्यात आली. रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने करणे शक्य होत आहे. राज्यात 57 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येत आहे. या अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी राज्यभरात दौरा केला असून नाशिक शेवटचा जिल्हा आहे. चांगल्या कामासाठी अधिकाऱ्यांचे कौतुक करताना त्यांच्या समस्यादेखील जाणून घेण्यात येत आहेत.

          यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणाऱ्या पन्नासहून अधिक अधिकाऱ्यांचा  प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी  सर विश्र्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे श्री.पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
          यावेळी श्री.हांडे यांनी सादरीकरणाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक मंडळात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. 2017 च्या अर्थसंकल्पात 44 कामे मंजूर असून चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पुर्ण करण्यात आले आहे. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती त्यांनी दिली. सुस्थितीत नसलेल्या पुलांच्या दुरुस्तीची 70 कामे  करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

          महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याची कामे महत्वाची असल्याने त्यास सीएसआरमधून तातडीने निधी मिळवून देण्यात येईल, असे श्री.पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा शासकीय जाहिरात फलकाच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सप्तश्रृंगगड येथे फ्युनिक्युलर ट्रॉलिचे काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे, असे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.

-----

No comments:

Post a Comment