Friday 23 February 2018

कृषि परिसंवाद

नाशिक जिल्हा कृषि महोत्सव 2018
कृषी व्यवसायात आत्मविश्वास गरजेचा- डॉ. रत्नाकर आहेर

नाशिक, 23 : कृषी व्यवसायात वाढ करुन अधिक उत्पन्न घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास गरजेचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा दुग्ध विकास अधिकारी  डॉ. रत्नाकर आहेर यांनी केले.
कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित  नाशिक कृषी महोत्सवात ‘शेतकी उद्योगाचा ध्यास हाच शेतकऱ्यांचा विकास’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.  यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, सह्याद्री उत्पादक कंपनीचे संचालक विलास शिंदे, दाभोळकर कृषि परिवाराचे समन्वयक वासुदेव साठे, देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. आहेर म्हणाले, शेती व्यवसायात नवीन बाजारपेठा निर्माण करण्याकडे आणि तेथे आपली उत्पादने पोहोचविण्याकडे लक्ष द्यायला हवे. सहकार्याच्या भावनेतून सामुहिकरित्या काम करणे गरजेचे आहे. शेतीला उद्योगाप्रमाणे समजून योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे यांनी ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, शहरात, उद्योगात, सेवाक्षेत्रात बदल होत असताना शेती क्षेत्रात पाहिजे तसे बदल होतांना दिसत नाहीत. शेतकऱ्यांना आज जागतिक स्पर्धेत उतरावे लागते. या स्पर्धेत सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन आपल्या क्षमतेचा वापर केला पाहिजे.
देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शिंदे यांनी यावेळी  ‘शेतकरी उत्पादक कंपनी- विकास व व्यवस्थापन’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रोड्युसर ॲक्ट सुधारणा कायद्यामुळे उत्पादक कंपनीत अनेक सुधारणा झाल्या. उत्पादन व्यवसायात मार्केटिंग पद्धतीची शेती केली तर आर्थिक विकासाला चालना मिळेल.
यावेळी उपस्थित इतर तज्ज्ञांनी शेतकरी उत्पादक,व्यवस्थापन ,कंपनी स्थापना, गट शेती, या विषयावर आपले मत व्यक्त केले.

---

No comments:

Post a Comment