Monday 1 August 2016


‘जलयुक्त’मुळे कायरेमधील पीक पद्धतील बदल
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पेठ तालुक्यातील कायरे गावात  झालेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविले गेले असून येथील पीक पद्धतीतही बदल होत आहे. शेतकरी आता पारंपरिक नागली ऐवजी भात, टमाटा, भाजीपाला अशा पिकांकडे वळू लागले आहेत.
गुजरातच्या सीमेजवळील कायरे गाव एक प्रकारचे ‘मिनी कोकण’ आहे. पश्चिम घाटावरील या निसर्गसुंदर गावात पाऊस चांगला असूनही  उतारामुळे सर्व पाणी खालच्या बाजूस वाहून जाते आणि उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवावे लागते. जलयुक्त शिवार योजना सुरू झाल्यानंतर जलसंधारण, वनविभाग, कृषि विभाग आदी विविध विभागांच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली.

ग्रामस्थांनी कामे सुरू असताना चांगले सहकार्य केले. कामांना ग्रामसभेत तात्काळ मान्यता देण्याबरोबरच  कामाच्या ठिकाणी सहकार्य करण्यासही गावकरी पुढे होते. बाहेरून आलेल्या ट्रॅक्टर किंवा यंत्रचालकांच्या भोजनाची व्यवस्था आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य गावकऱ्यांनी केले.

गावात चार माती नाला बांध तयार करण्यात आले. त्यांच्या मजबूतीकरणासाठी बाहेरून काळी माती आणून तीचा थर एका बाजूने देण्यात आला. पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी तीन दगडी बांध घालण्यात आले. 70 हेक्टर क्षेत्रावर मजगीची कामे करण्यात आली. 20 हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर करण्यात आले. त्यामुळे पाणी शिवारात जिरण्याचे प्रमाण वाढले आहे आणि गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

 सहा साखळी सिमेंट बंधारे आणि 9 वनतळ्यांमुळे एकूण 427 टीसीएम क्षमता अधिक निर्माण झाली आहे. गावाची गरज 775 टीसीएम असून पूर्वी केवळ 357 टीसीएम पाणी उपलब्ध होते. नव्याने उपलब्ध पाणीसाठ्यामुळे गाव टँकरमुक्त होणार आहे. मजगीमुळे भाताची लागवड इथे मोठ्या प्रमाणात झाली आहे. खडकाळ जमीन असुनही पाण्याच्या उपलब्धतेमुळे भातपीक क्षेत्र वाढते आहे. पीक पद्धतीत अनुकुल बदल झाल्याने ग्रामस्थांच उत्पन्नातही भर पडणार आहे.
मजगी आणि सलग समतल चरमुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून गावात कृषि विभागाचे अधिकारी गेले असता आजही ग्रामस्थ त्यांच्याकडे ही दोन्ही कामे अधिक प्रमाणत घेण्याची मागणी करताना दिसतात.


पुंडलीक सातपुते- जलयुक्त शिवार योजना ही शासनाची अत्यंत चांगली योजना असून कायरे गावाचे अर्थकारण या योजनेमुळे बदलणार आहे. इथल्या शेतीला या योजनेमुळे आणि कृषि विभागाच्या सहकार्याने नवी दिशा मिळाली आहे.

गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून कायरे बरोबरच सावरणे गावाचा पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. या दोन्ही गावात शेतीचे नवे प्रयोग करण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घेतला आहे. एकूणच जलयुक्त शिवार योजनेमुळे कायरेसारख्या आदिवासी गावातील नागरीक कृषि विकासाकडे वाटचाल करू लागले आहेत.

No comments:

Post a Comment