Friday 5 August 2016


पूरबाधित गावात आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा
नाशिक दि.5- सायखेडा आणि चांदोरी याठिकाणी आलेल्या पुरानंतर संसर्गजन्य आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आी आहेत.
आरोग्य विभागाने चांदोरीत एकूण 4 पथके आणि सायखेड्यात 3 पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, १ फार्मिस्टचा समावेश आहे. पथकाद्वारे  गरजुंना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र अग्निशमन विभागाच्या मदतीने स्वच्छ करण्यात आले असून साथीचे रोग पसरू नये यासाठी विशेष मोहिम आजपासून राबविण्यात येत आहे.
घरोघरी जावून गरजेनुसार वैद्यकीय सुविध देण्यात येणार आहेत. दोन्ही गावात 108 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपतकालीन परिस्थितीसाठी साधी रुग्णवाहिका मदत कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. मदत केंद्रावर आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी आणि उपचार सुरु आहेत.
नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे आणि साथीचे रोग पसरू नयेत यासाठी चांदोरीला विंधन विहिरीतील पाण्याचे सुपरक्लोरिनेशन करण्यात येत आहे. टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर क्लोरिनेशन सोबतच टँकरच्या स्वच्छतेची तपासणीदेखील करण्यात येत आहे.   
          पुरानंतर मलेरिया आणि साथीचे रोग पसरू नये यासाठी  प्रशासनाकडून  आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे आणि उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment