Saturday 6 August 2016


महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक-एकनाथ डवले
नाशिक दि.6:- महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या  सक्षम होणे आवश्यक  असून महसूल विभागातर्फे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
चांदवड येथे ‘महिला सक्षमीकरण सप्ताह’ निमित्त आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पंचायत समिती सभापती सुनिता जाधव,  उपविभागीय अधिकारी बी.आर.दराडे, नगरारध्यक्ष भूषण कासलीवाल, तहसीलदार माणिक आहेर, गटविकास अधिकारी भूषण बेडसे, पोलिस निरिक्षक आनंत मोहिते आदी उपस्थित होते.

श्री.डवले म्हणाले, आर्थिक प्रगतीशिवाय महिलांच्या समस्या  दूर होणार नाहीत. त्यामुळेच शासनाने महिलांना सक्षम करण्याची भूमीका स्विकारली आहे. महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक मुलीला शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्यात आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याचीदेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तिची काळजी घेणे महत्वाचे आहे. महिलांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यावे आणि अन्याय सहन न करता आपल्या मताशी ठाम रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ.आहेर यांनी प्रशासनातर्फे महिलांसाठी आयोजित मेळावा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष लक्ष दिले जाणे महत्वाचे आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होणेदेखील आवश्यक आहे. मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले. लोकसहभागातून चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियान राबविले गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  शासनाची प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, महिलांचा सामाजिक कार्यातील सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे महिलांच्या समस्या दूर करणे अधिक महत्वाचे आहे. महिलांची आर्थिक उन्नती झाल्यास त्या अधिक सक्षम होऊ शकतील. याच उद्देशाने महाराजस्व अभियानांतर्गत तालुका, मंडळ आणि गावपातळीवर महाराजस्व अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.  महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. तसेच स्त्री-पुरुष लोकसंख्येच्या प्रमाणातील फरक चिंताजनक असून हा फरक दूर करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

श्री.स्वामी यांनी पीसीपिएनडीटी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात माहिती दिली. विद्यार्थींनींनी शालेय जीवनात व्यक्तिमत्व विकसीत करून प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यावर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महसूल अभियानाचे वेगळेपण त्यांनी मांडले.
श्री.लांडगे यांनी जिल्हा परिषदेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

प्रास्ताविकात श्री.दराडे यांनी मेळाव्याच्या आयोजनाची माहिती दिली. मेळाव्यांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे धनादेश, जात पडताळण प्रमाणपत्र, क्रिमीलेयर प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले. 3152 दाखले, 16 लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत 3 लाख 20 हजाराचे  अर्थसहाय्य, 450 पिवळ्या शिधापत्रिका आणि कृषि विभागातर्फे 9 मेज मॉइस्चर मीटर तसेच 15 शेततळ्यांच्या अनुदान मंजूरीच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment