Saturday 6 August 2016


महिला सक्षमीकरणासाठी
कुटुंबात स्त्री शिकली तर घर शिकते, कुटुंब शिकते, गाव शिकते असे म्हटले जाते. स्‍त्री शिक्षणावर शासनाने भर दिल्याने कुटुंबाच्या साक्षरतेबरोबरच विविध क्षेत्रात स्त्री प्रमुख भूमि‌का निभावतांना दिसत आहे. ही प्रक्रीया अधिक वेगवान करून महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी  राज्य शासनामार्फत महसूल दिनानिमित्त महिला सक्षमीकरण अभियान आयोजित करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत महसूल मंडळनिहाय गाव पातळीवर महिला खातेदारासाठी मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विविध उपक्रम कृषी, सहकार, महिला व बालकल्याण या विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.
महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी गावपातळीवर कृषी, सहकार, महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देवून त्यांचा या योजनांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांचा हा सहभाग त्यांच्या कुटुंब तसेच विविध कार्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महिलांच्या समस्या जाणून त्यांचे समाधान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांच्या समस्या दूर करून त्यांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी आठवड्यात आयोजित विविध उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.
महसूल विभागामार्फत सातबारा उताऱ्यावर पुरुषांबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वारस नोंदी करतांना कुटूंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असली तर नव्याने वारस नोंद घेऊन महिलांचा समावेश करण्यात येत आहे. महिला खातेदारांच्या वहिवाट किंवा पांधण रस्त्यासंदर्भात असलेल्या तक्रारी तसेच महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयाचे अर्जांवर  प्राधान्याने कार्यवाही  या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेवून मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटूंबप्रमुख म्हणून महिलांची नोंदणी  या अभियानातून करण्यात येत आहे. निवडणूक शाखेमार्फत मतदार याद्यामध्ये १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुली व मतदार नोंदणी न झालेल्या  मुली, मतदार नोंदणी न झालेल्या महिलांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी दाखले वितरणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून आधार नोंदणी मध्ये महिलांच्या अधिक नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सातबारा नोंदी, वहिवाट नोंदी यात महिलांची फसवणूक झालेली असते. त्यांना या प्रशासकीय कामकाज, कागदपत्रांची पुर्तता याबाबत अल्प माहिती असते. महिलांना तिच्या अधिकारांबाबत जागरूक करण्यासाठी, याबाबत तिच्या अधिकारांची तिला नव्याने ओळख करून देण्यासाठी शासनाने हे अभियान सुरू केले आहे.
मालेगांव तालुक्यात महसूल विभागामार्फत महिला प्रबोधनाचे 21 कार्यक्रम राबविण्यात आले असून कार्यक्रमात 249संगणकीकृत  सातबाराचे वितरण महिलांना करण्यात आले. रोजगार हमी योजनेतंर्गत  जॉबकार्डधारक 84 महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. 1204 शिधा पत्रिकेचे वाटप व 35 महिलांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यात आले. शाळा व महाविद्यालयात विद्यार्थींनींना  दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेत अधिकाधीक महिलांना समाविष्ट करून घेण्यासाठी  महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन आहे. याचा लाभ महिलांनी घेतल्यास सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेला निश्चितपणे गती मिळू शकेल.
000

No comments:

Post a Comment