Monday 29 August 2016

सायबर क्राईम लॅबचे यश
पंधरा दिवसात दहा गुन्ह्यांचा यशस्वी तपास

नाशिक दि.29- नव्याने स्थापित करण्यात आलेल्या सायबर क्राईम लॅबमुळे शहर पोलीसांनी सायबर गुन्हे प्रकारात पंधरा दिवसात दहा गुन्ह्यांचा यशस्वी तपास करण्यात  यश मिळविले आहे.
स्वातंत्रदिनी राज्यात एकाच वेळी 42 सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले होते. जिल्ह्यात देखील आडगाव येथील पोलीस मुख्यालयात तसेच पोलीस आयुक्त कार्यालयात लॅबचा शुभारंभ करण्यात आला होता. शहर पोलीसांनी या लॅबच्या माध्यमातून मोबाईल फोन गहाळ होणे, मीडिया मार्फत आक्षेपहार्य संदेश पसरविणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध यशस्वीपणे घेतला आहे.
या लॅबमुळे तांत्रिक गुन्ह्यांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्याचे ध्येय गृहविभागाने ठेवले आहे.  ही लॅब अद्ययावत सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि तंत्रज्ञांनी परिपूर्ण अशी आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पसरविणे त्याचप्रमाणे अश्लील छायाचित्रे, चलतचित्रे पसरविणे आदी प्रकारांना पायबंद घालण्याबरोबरच हॅकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.
          

          सध्या या लॅबमध्ये तपासासोबतच जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सायबर गुन्ह्यांचा तपास करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी. नागरिकांना लॉटरी किंवा बक्षिसे लागल्याबाबतच्या आमिषांना बळी पडू नये. स्वतःची वैयक्तिक माहिती तसेच बँकेने पाठवलेला पासवर्ड मेसेज फोनवरून अनोळखी व्यक्तीस देऊ नये. अँडरॉईड फोनवर प्ले स्टोर मधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करतेवेळी त्याच्या अटी आणि शर्ती वाचून मगच डाऊनलोड करावे अन्यथा आपली सर्व माहिती हॅक होण्याची शक्यता असते. काही तक्रारी असल्यास ०२५३-२३०५२२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले आहे.

·        जर मोबाईल फोन गहाळ झाला असेल तर तत्काळ त्यातील सीम कार्ड बंद करावे.
·        ज्या हद्दीत फोन गहाळ होतो त्या हद्दीतील पोलीस स्टेशनला रीतसर अर्ज करावा. अर्ज करतेवेळी फोन बिलची  झेरॉक्स जोडावी.
·        IMEI नंबर अर्जात नमूद असणे आवश्यक आहे.
जनजागृतीसाठी ‘नाशिक सायबर क्लब’
सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पसरविणे त्याचप्रमाणे अश्लील छायाचित्रे, चलतचित्रे पसरविणे आदी प्रकार टाळण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नाशिक सायबर क्लब’ स्थापन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शहर व परिसरातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना एकत्र आणून किचकट सायबर गुन्हे उघडकीस  आणण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने घडणारे गुन्हे, त्यापासून संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता, गुन्हे घडल्यावर करावयाची कार्यवाही आदींबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन या माध्यामातून केले जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातदेखील सायबर तज्ज्ञ आणि सायबर लॅब अधिकारी याच्या सहकार्याने अशा प्रकारची जागृती केले जाणार असल्याही माहिती, श्री.पवार यांनी दिली.  नागरिकांना नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नाशिक सायबर क्लब या फेसबुक पेजचा देखील माहितीच्या आदान-प्रदानासाठी उपयोग करता येणार आहे.   
000000000

No comments:

Post a Comment