Thursday 4 August 2016

एक अनोखा अनुभव
ऑगस्ट महिन्याची सुरुवातच दमदार पावसाने झाली. सुरूवातीस नाशिककरांना पावसाने दिलेला आनंद चिंतेत केव्हा बदलला ते कळलेच नाही. दोन दिवसाच्या पावसामुळे नाशिकची जीवनवाहिनीगोदामाईकोपली. नदीकिनाऱ्याच्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले. स्वत: पालकमंत्री गिरीष महाजन यांनी विधीमंडळ अधिवेशनातून वेळ काढीत तात्काळ नाशिक गाठले.
मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्यावेळी मंत्रीमहोदयांसह सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर घटनेचे गांभिर्य स्पष्टपणे दिसत होते. आपत्ती व्यवस्थापनाचा हा माझा पहिलाच अनुभव…..
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीपूर्वीच लष्कराच्या अधिकाऱ्यांशी मदतकार्याविषयी चर्चा केली. निवासी उपजिल्हाधिकारी रात्रभर आपत्ती व्यवस्थापनात व्यस्त होते. प्रत्येक कामात सुसूत्रता दिसत होती.
 बैठकीत पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन मदतकार्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी गोदावरी नदी परिसरातील होळकर पूल आणि महानगरपालिका शाळा क्र. 30 ला भेट दिली. पूरबाधितांना धीर देत मदतीबाबत त्यांनी आश्वस्त केले. गोदावरीतील दुतोंड्या मारुती म्हणजे पूराची तीव्रता दर्शवणारी खुण. त्याचे बुडणे, नारोशंकराच्या घंटेपर्यंत पाणी जाणे अशा चर्चा नागरिकात सुरूच होत्या. पडत्या पावसात पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा सुरू होता.

सायखेडा गावाला पूराने वेढा दिला होता. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून काही ठिकाणी वेगाने पाणी वाहत असतानादेखील नागरिकांना दिलासा देण्यासाठी अशा परिस्थितीत पालकमंत्री महाजन सायखेड्याला पोहोचले. मदतकार्य वेगाने करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पूरबाधितांना सुविधा देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. असे एकीकडे सुरू असताना सेल्फी काढणरे आणि पूर पहायला येणारे गर्दीत होतेच. खरे तर असे टाळले तर मदतकार्य अधिक वेगाने होऊ शकेल.

दुसऱ्या दिवशी रात्री पाऊस कमी झाल्याने गोदावरीचा पूर ओसरला असला तरी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे चांदोरी गावात पाणी होतेच. विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट देऊन नागरिकांना शुद्ध पाणी, जेवण आणि आरोग्य सुविधा देण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गावात कार्यरत होती. एनडीआरएफच्या जवानांनी पूरातून अनेक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रशासनाविषयी विश्वासाची भावना विशेष नोंद घेण्यासारखी होती. स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी प्रशासनाला केलेली उत्स्फुर्त मदतही महत्वाची ठरली.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 x 7 सुरू होता. किती अधिकारी आणि कर्मचारी या संपूर्ण व्यवस्थेत कार्यरत असतील याचा अंदाज येणे शक्यच नाही. दिसत होते ते फक्त अनुकूल परिणाम. महावितरणने वीजेच्या बाबतीतही उत्तम कार्य केले. पोलीसांनी केवळ व्यवस्था राखण्याचे काम करता पंचवटी भागात नागरिकांना पूरातून बाहेर काढण्याचे कार्य केले.

नाशिक शहर आणि परिसरातील गावातही महानगरपालिकेच्या अग्निश्मन विभागाने चांगली कामगिरी करीत अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. पूरानंतर स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासही सुरूवात झाली आहे. ट्विटरवर प्रशासनाविषयी चांगले ट्विट बघून एवढी मोठी यंत्रणा  आणि तिच्यातील समन्वयाला दाद द्यावीशी वाटते. जिल्हा माहिती कार्यालयाने सकाळपासून रात्रीपर्यंत माध्यमांना सतत दिलेल्या अपडेटने कार्यालयाचे कौतुक करणारे ट्विट पाहून आपणही त्या यंत्रणेचा भाग असल्याचा आनंद वाटला.
या संपूर्ण प्रक्रीयेत वृत्तांकन करताना अनेक अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना आपत्तीच्या परिस्थितीलाही धीराने तोंड कसे द्यावे, याचे जणू चांगले प्रशिक्षण झाले. पूर्वनियोजन असल्याशिवाय हे शक्यच नाही. प्रशासनाचे नागरिकांनी कौतुक केले ते यासाठीच!.....आणि जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील स्वयंसेवी संस्था, एनडीआरएफ आणि नागरिकांना सहकार्यासाठी धन्यवाद दिले. एक चांगल्या अनुभवाचे साक्षीदार होता आले याचा आनंद आहेच....अर्थातच पुढच्या कामासाठी प्रेरणाही..!
शब्दांकन-  वैभव कातकाडे

(लेखक हे जिल्हा माहिती कार्यालय नाशिक येथे आंतरवासिता करीत आहेत.)

No comments:

Post a Comment