Saturday 27 August 2016


नाशिकला जगाच्या पर्यटन नकाशावार आणण्यासाठी प्रयत्न करणार
                           -जयकुमार रावल
          नाशिक दि 27 :- जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून जिल्ह्याला जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, योगेश घोलप, दिपीका चव्हाण, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे,  अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, एमटीडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप आदी उपस्थित होते.
श्री.रावल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र’ वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. लोणावळ्याला पर्याय म्हणून इगतपुरी परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यात यावा. विविध विभागांनी परस्पर समन्वयाने पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. विभागीय स्तरावर तीन महिन्यातून एकदा पर्यटनाशी संबंधीत विविध घटकांची एकत्रित बैठक घेऊन पर्यटन विकासाला चालना देण्याची सुचना त्यांनी केली.

पर्यटन विकासासाठी विशिष्ट प्राधिकरणाबाबत विचार करण्याची गरज असल्याचे नमूद करून श्री.रावल म्हणाले,  उद्योगात गुंतवणूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा पर्यटन क्षेत्रात तेवढ्याच गुंतवणूकीत चारपट रोजगार निर्माण होतात. स्थानिक नागरिकांना याचा विशेष  लाभ होतो. त्यामुळेच शासनाने पर्यटन क्षेत्राच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे. पर्यटन विकासासाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात येणार असून त्यात नाशिकसाठी स्वतंत्र विभाग असेल, असे त्यांनी सांगितले.
 गोवर्धन येथे विकसीत करण्यात येणाऱ्या कलाग्रामला पारंपरिक बाजाराचे स्वरुप देण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने निवास-न्याहरी योजनेचा जिल्ह्यात अधिकाधीक प्रसार करण्यात यावा. रिक्शा टॅक्सी चालकांना पर्यटनाच्यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सुचना त्यांनी केल्या. गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी आरतीसाठी 20 लाख रुपये देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. मांगी-तुंगी तीर्थक्षेत्र औरंगाबाद सर्कीटला जोडून तेथील पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.डवले यांनी पर्यटन संस्था, पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यक्ती, शासनाचे विविध विभाग, टूर ऑपरेटर्स आदींना एका व्यासपीठावर आणून पर्यटन विकासाबाबत एमटीडीसीने चर्चा घडवून आणावी, अशी सुचना केली. अंतर्गत शिर्डी, भंडारदरा, शनी शिंगणापूर, नांदूर-मधमेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचा समावेश असणारे विभागीय पर्यटन सर्कीट विकसीत करून पर्यटकांना अधिक संख्येने आकर्षित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी हतगड, सप्तश्रृंगीगड, चांदवड येथील रंगमहाल, मांगी-तुंगी, सोमेश्वर, टाकळी, नांदूर-मधमेश्वर आदी विविध पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत चर्चा केली. श्रीमती बढे यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.
पर्यटनमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तिकांचा संच भेट दिला. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंळाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

000000000

No comments:

Post a Comment