Tuesday 30 August 2016

महाअवयवदान रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद
अवयवदान जनजागृतीच्या संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधले
            
              
          नाशिक दि 30 :- जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विद्यान विद्यापीठातर्फे महाअवयवदान अभियानांतर्गत आयोजित रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती संदेशांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. रॅलीच्या समारोपप्रसंगी अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

          रॅलीचा शुभारंभ अनंत कान्हेरे मैदान येथे करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निलीमाताई पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. सुनिल पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

          रॅलीच्या उद्घाटप्रसंगी मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश दिला. जिल्हा रुगणालय, जिल्हा परिषद, कालीदास नाट्यगृह, शालीमार, महात्मा गांधी मार्ग, कन्या शाळामार्गे शिवाजी स्टेडीअम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. ‘अवयवदान श्रेष्ठ दान’,  ‘बी अ डोनर, बी अ हिरो’,  ‘ऑर्गन डोनेशन, बेस्ट डोनेशन’च्या घोषणा देत रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी मृत्युनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेण्याचे  आवाहन जनतेला केले.

          समारोपप्रसंगी  नामको महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी, सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे अवयवदानाचे महत्व मांडले. याप्रसंगी बोलताना श्री.बगाटे म्हणाले, आपल्या संस्कृतीने ‘मरावे परि किर्ती रुपे उरावे’ हा संदेश दिला आहे. तसेच दानाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. मृत्युनंतरही आपली आठवण कायम ठेवण्याची संधी अवयवदानातून प्राप्त होते. ही समाजसेवेची आणि मानवतेची सेवा करण्याची संधी असल्याने नागरिकांनी मृत्युनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन त्याची माहिती आताच कुटुंबियांना द्यावी, असे त्यांनी सांगितले.

          आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत 15 महाविद्यालये, इतर 24 महाविद्यालये, सेवाभावी संस्था, आयएमए आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी  या रॅलीत सहभाग घेतला.
अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार
समारोपप्रसंगी ब्रेनडेड झाल्यानंतर अवयवादन करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.भाऊसाहेब  मोरे आणि डॉ.संजय रकीबे यांचादेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 युवराज आणि सविता भारंबे यांनी आपल्या 14 वर्षाच्या मुलाच्या मृत्युनंतर त्याचे अवयवदान केले होते. आपल्या मुलाच्या निधनाचे दु:ख आहेच मात्र त्याचबरोबर एका व्यक्तीला नवे जीवन मिळाल्याचे समाधानही आहे. अवयवदान हा कुटुंबाचा निर्णय असतो आणि त्यामुळे इतर अनेकांना नवे जीवन मिळू शकते, अशी प्रतिक्रीया श्री.भारंबे यांनी व्यक्त केली.

फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जयंत पटेल याने वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांचा विरोध असतानाही जयंतने माघार घेतली नाही आणि निश्चयाने डॉक्टरांना अवयवदानाचा निर्णय सांगितला. वडिलांना जीवंत ठेवू शकत नव्हतो, मात्र माझ्याकडे इतरांना नवे जीवन देण्याची संधी होती. अवयवदानामुळे इतर कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण करता येतो. नव्या पिढीनेच या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

शहापूर येथील सुभाष भानुशाली नाशिक येथे आले असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर भानुशाली यांनी  वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयवदान केले. अवयवदानामुळे इतर माणसे आनंदात जगू शकतील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना आपणही अवयवदान करणार असल्याचे सांगितले.
अवयवदानासाठी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे डॉ. रकीबे यांचे सहकार्य लाभल्याचेही या तिघांनी सांगितले.
अवयवदान अभियान 1 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणारा असून या कालावधीत अवयवदानासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी पथनाट्य, विविध स्पर्धा, कार्यशाळाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
000000000

No comments:

Post a Comment