Tuesday 9 August 2016


'आदिवासी जनहिताय'
नाशिकच्या ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी बहुल भागात फिरल्यानंतर या भागातला विकास चटकन नजरेत भरणारा आहे. नागरिकांच्या जीवनमानात पडणारा फरकही तेवढाच प्रकर्षाने इथे जाणवतो. मधूनच एखाद्या घरासमोर दिसणारी चारचाकी, डिश अँटेना, इंग्रजीतून विश्वासाने बोलणारे विद्यार्थी या बदलाची जाणीव करून देतात.


आदिवासी दिनाच्या निमित्ताने नाशिक, त्र्यंबकेश्वर  आणि पेठ तालुक्यातील आदिवासी बहुल भागाचा दौरा झाला. या दौऱ्याच्या माध्यमातून या सर्व समारात्मक बदलाची नोंद घेता आली. गुणात्मक विकास घडविण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एकलव्य विद्यालय किंवा आदिवासी आश्रमशाळांच्या माध्यमातून हे ‘वाघिणीचे दूध’ पाड्यावर राहणाऱ्या मुलांनाही मिळतंय.


आश्रमशाळांनी कात टाकल्याची साक्ष बोरवट आणि इनामबारी आश्रामशाळांच्या इमारती देतात. इनामबारीमध्ये आश्रमशाळेसाठी शहराच्या तोडीचे बहुउद्देशीय सभागृह उभारले जात आहे. विद्यार्थ्यांना गावापासून दूर असलेल्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी उभारलेल्या वसतीगृहातही चांगल्या सुविधा आहेत. एकलव्य शाळेतील विज्ञान कक्ष पाहिल्यावर इथले विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत का पोहोचतात याची प्रचिती येते.


ठक्कर बाप्पा योजनेच्या माध्यमातून वाडी-तांड्यावरील रस्ते सिमेंटचे झाले. काही ठिकाणी पाण्याची टाकी, सभामंडप, सभागृह अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातल्या हनुमाननगरमधील अंगणवाडीची इमारतही सुंदर आणि सुविधांनी युक्त अशी आहे. गावात सोलर दिवे लावलेले दिसतात. ‘अधी लई गारा व्हायचा, हिथं काही बी नव्हतं, आत्ता अंगणवाडी, ग्रामपंचायत, रस्ते समदं झालं. बचतगटानं रेशन गावात आलया’ हनुमाननगरच्या  गोदाबाई खोटरे यांची ही बोलकी प्रतिक्रीया….


…..सेंट्रल किचन असो वा अमृत आहार विविध योजनांच्या माध्यमातून डोंगर-दऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवांपर्यंत विकासगंगा पोहोचविण्याचे प्रयत्न आहेत. आदिवासी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठीदेखील वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. कोपर्ली गावात जमिनीचे सपाटीकरण करून अकरा शेतकऱ्यांना मजगी  तयार करून देण्यात आली. त्यामुळे जेथे केवळ चारा किंवा काही प्रमाणात नागली व्हायची त्याच ठिकाणी भात, भुईमुग, वरी, नागली आदीच पेरणी झाल्याचे पाहिल्यावर परिवर्तन शब्दाचा अर्थ लक्षात येतो.

          विशेष म्हणजे या भागात अनुकूल बदल व्हावेत ही भावना नागरिकात दिसून आली. ज्या कौतुकाने महिला गावाच्या विकासाबाबत बोलतात, समस्या मांडतात ते पाहता विकासाचा प्रवाह पुढे जात असल्याचे लक्षात येते. मुलांची शाळेतली शिस्त, वैज्ञानिक प्रतिकृतीबद्दील विश्वासाने बोलणे, मोठी स्वप्न पाहणे हे सर्व कौतुकास्पदच आहे…आणि त्यांना हवे असलेले वातावरण, सुविधा देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे.

          पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात दाखल होण्यास अवघा एक महिनाही झाला नसताना प्रशिक्षणार्थी युवक प्रशिक्षणाचे विविध अंग सहज आत्मसात करतात. वनपट्टे  आणि विहिर मिळाल्याने नागलवाडीत नागलीची जागा  हळदीने घेतली आहे. बदल बरेच आहेत, आणखीनही व्हायचे आहेत. शासनाचे प्रयत्न त्याच दिशेने आहेत. डोंगरात वसलेल्या वाड्यांमधून फिरले की  हे प्रयत्न दृष्य स्वरुपात दिसतात, ‘आदिवासी जनहिताय’ हे ब्रीद घेऊन एक पाऊल पुढे पडलेले लक्षात येते.

No comments:

Post a Comment