Friday 5 August 2016


पशूधन विमा पंधरवडा
जनावरांचा विमा उतरविणेकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असून 1 ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत ‘पशुधन विमा पंधरवडा’ साजरा करण्यात येत  आहे.
या उकपक्रमांतर्गत देशी आणि संकरीत गाई-म्हशी, पाळीव पशु(घोडे,गाढव,बैल आणि रेडे) आणि शेळ्या-मेंढ्या  यांचा पशुधन विम्यासाठी  समावेश  करण्यात आला आहे. योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जास्तीत जास्त प्रती लाभार्थी प्रती कुटुंब 5 जनावरांचा समावेश करण्यात आला आहे. विमा रक्कम हि जनावराचे वय, स्वास्थ्य आणि दूध उत्पादनावर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि विमा कंपनी यांनी निश्चित केलेल्या किमतीवर आधारित आहे.
शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांना लाभ द्यायचा झाल्यास अनुदान देय ठरविण्यासाठी एक पशुधन घटक यावर आधारित अनुदानाचा लाभ निश्चित करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे दहा शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे  असे समजण्यात येते.5  पशुधन घटकाप्रमाणे 50 शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांचा लाभ देण्यात येतो. पाचपेक्षा कमी संया असलेल्या लाभार्थींना  एक पशुधन घटक समजून लाभ देण्यात येत आहे.
          दुभत्या जनावरांसाठी किंमत प्रति दिन दुध उत्पादनावर आधारित किंवा शासनाने ठरविल्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थानिक बाजारातील आधारभूत किंमतीनुसार निश्चित करण्यात येते. गायींकरिता ही किंमत किमान तीन हजार रुपये प्रति लिटर आणि म्हशीकरिता चार हजार प्रति लिटर आहे. अशा प्रकारे पन्नास हजार किंमतीच्या जनावरांचा विमा उतरविणेकरिता सर्वसाधारण लाभार्थीसाठी 705 रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीचे लाभार्थीसाठी 441 रुपये खर्च अपेक्षित आहे.
          जनावरांची ओळख निश्चित करण्याकरिता बारा अंकी विशिष्ट क्रमांकाचा बिल्ला जनावरांच्या कानात मारण्यात येतो. दावा करतेवेळी जनावरांच्या कानात बिल्ला असणे आवश्यक आहे. कानातील बिल्याद्वारेच जनावरांची पूर्णत: ओळख निश्चित करता येते. नेहमीच्या प्रचलित पद्धतीने जनावरांच्या कानात बिल्ला मारण्यात येतो.
          विमा उतरविलेले जनावर पशुपालकाने विमा मुदतीत विक्री केल्यास सदर विमा नवीन लाभार्थीस हस्तांतरित करता येतो. सदर हस्तांतरणाची कार्यवाहीसाठी आवश्यक फी, सेल डीड याबाबत विमा कंपनीस कंत्राट देणेपुर्वी सदरची भूमिका विमा कंपनीच्या संमतीने निश्चित करण्यात येते.
          विमाविषयक दावे निकाली काढण्याकरिता विमा उतरविल्याची मुळ पॉलीसी, जनावर मृत झालेबाबत विमा कंपनीस दिलेली सूचना, क्लेम फॉर्म व शवविच्छेदन प्रमाणपत्र तसेच मृत जनावराच्या कानातील बिल्ल्यासह आणि विमा लाभार्थी यांचा एकत्रित छायाचित्र अशा केवळ चार कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असेल.
          अनुदानाचे प्रमाण हे विभागानुसार ठरविलेले आहे यात नक्षलग्रस्त जिल्हे वगळून दारिद्र्य रेषेवरील 50 टक्के व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती यांना 70 टक्के अनुदान असणार आहे.
          नक्षलग्रस्त जिल्हे (गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर) यात दारिद्र्य रेषेवरील 60 टक्के व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी तसेच अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीचे लाभार्थ्यांना 80 टक्के अनुदान दिले जाईल.
          विमा प्रिमियर दर नक्षलग्रस्त जिल्हे वगळून एक वर्षासाठी 2.45 टक्के तर तीन वर्षासाठी 6.40 टक्के असेल. नक्षलग्रस्त जिल्ह्यात एक वर्षासाठी 2.90 टक्के तर तीनवर्षासाठी 8.10 टक्के असेल. याशिवाय सेवाकराची रक्कम संबंधित लाभार्थीने भरायाची आहे.
    अधिक माहितीसाठी (पशुसंवर्धन विभाग) 1800 2330418 आणि (विमा कंपनी) 1800 2091415 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा किंवा www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे पशुसंवर्धन उपायुक्त नाशिक यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment