Monday 29 August 2016

महा अवयवदान जनजागृती अभियान

सध्या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानाला चालना मिळावी याकरिता 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राज्यस्तरावर ‘महा अवयवदान अभियान’ राबविण्यात येणार आहे. 

अवयवदानाअंतर्गत ‘लाईव्ह ऑर्गन डोनेशन’द्वारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच कॅडेव्हर, मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात किडनी, यकृत, फुफ्फुस, हृदय, त्वचा इत्यादी अवयवदान करण्यात येतात. सद्यस्थितीत राज्यभरात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून जनतेत या विषयाबाबत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे सहकार्य घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

अभियानांतर्गत 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येतील. इच्छुकांना अवयवदान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी तालुकास्तरावर महारॅलीचे आयोजन करण्यात येईल. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान अभियान नोंदणी आणि अवयवदात्यांचा सत्कार करण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध विभागांमार्फत अवयवदान जागृती अभियान राबविण्यासाठी समन्वयाचे काम तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता करतील. जेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसेल तेथे जिल्हा शल्य चिकित्सक समन्वयाचे काम करतील.
 

अभियानाचे नियोजन राज्यभरातून व्यापक स्वरूपात विविध विभागाच्या समन्वयाने यशस्वीरित्या होण्यासाठी विविधस्तरावर समित्या गठीत करण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील या जनजागृती अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
संचालक, आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम 1994 अन्वये समुचित प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. अवयव जागृती अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या संदेशाने होईल. त्याच वेळी जिल्हा स्तरावर अभियानाचा शुभारंभ होणार आहे. महा अवयवदान अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन जिल्ह्यांची निवड राज्यस्तरीय अवयवदान अभियान समितीमार्फत करण्यात येऊन त्यांचा यशोचित गौरव प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे.

माणसाचे जीवन जरी मर्यादीत असले तरी अवयवदानाच्या माध्यमातून आपल्या स्मृती कायम ठेवता येतात. एखाद्याला नवे जीवन मिळू शकते. त्यामुळेच अवयवदानाचे महत्त्व आहे. ते जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच ही मोहिम आहे.

-विनोद पाटील
जिल्हा माहिती कार्यालय, 

नाशिक.

No comments:

Post a Comment