Sunday 28 August 2016

अवयवदाते पुढे यावेत याकरिता महा अवयवदान अभियान- गिरीष महाजन



राज्यात येत्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत महा अवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात अवयवदाते पुढे यावेत आणि सर्वसामान्यांमधून अवयवदानास चालना मिळावी याकरिता प्रयत्न आणि जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याशी साधलेला संवाद....

अवयवदान जागृती महाअभियान नेमके काय आहे? या मागची पार्श्वभूमी काय?
मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 साली अंमलात आल्यापासून मागील 22 वर्षात राज्यभरात 11,365 किडनीच्या 470 लिवरच्या तर 20 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रीया झाल्या असून डोळ्यांच्या 480 व फुप्फुसाच्या फक्त तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.. प्रत्यक्षात देशभरात पाच लाखांहून अधिक किडनी, 50 हजार लिव्हर तर 2000 पेक्षा अधिक रुग्ण गंभीर हृदय विकारांनी त्रस्त आहेत, जे सर्व अवयवदात्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना अवयवदाता वेळेवर उपलब्ध झाल्यास पुनर्जीवन मिळू शकते अन्यथा मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मनकी बात या कार्यक्रमाद्वारे अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन अवयवदानाचे कार्य हाती घेण्याबाबत नमूद केले. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अवयवदाते पुढे यावेत व सर्वसामान्यांमधून अवयवदानास चालना मिळावी या करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने अवयवदान अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाचे स्वरुप कसे असणार आहे ?
दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत हे अभियान राज्यभरात राबविण्यात येईल. या अभियानाचे उद्घाटन प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी सकाळी मुख्य रस्त्यावर 07.30 वाजेपासून जागृती रॅली द्वारे संबंधित पालकमंत्री/ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केले जाईल. याच दिवशी याच वेळी मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत मरीन ड्राईव्ह मुंबई येथे जागृती रॅली द्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे. दि. 31 ऑगस्ट रोजी अवयवदान जागृतीबाबत चर्चासत्रे/ व्याख्याने/ प्रदर्शने, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल आणि दि. 1 सप्टेंबर रोजी अवयवदान नोंदणी शिबिरे घेऊन त्याठिकाणी अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियाचा सन्मान करण्यात येईल.

या अभियानात कोणकोण सहभागी आहेत ?
 
मुख्यत्वे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा/ प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये/ रुग्णालये, विविध विद्यापीठातील महाविद्यालये/ रुग्णालये विविध विद्यापीठातील महाविद्यालये, वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था यांसोबत विविध शासकीय अधिकारी/ कर्मचारी यात सहभागी होत आहेत. तसेच विभागीय प्रत्यारोपण समित्या या देखील मोठ्या प्रमाणात यात सहभागी आहेत. विविध धर्माचे अध्यात्मिक गुरुदेखील पाठींबा देत आहेत.

अभियानादरम्यान इच्छित अवयवदात्यांच्या नोंदणीसाठी काही विशेष योजना आहेत का ?
 
होय, अवयवदात्यांच्या नोंदणीसाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्यांच्या ठिकाणी अभियानाची निमंत्रणे तसेच आवश्यक माहितीसह नोंदणीचे फॉर्मस घरोघरी वाटून लोकांना अवयवदानाबाबत नोंदणीसाठी आग्रह करण्यात येईल. तसेच नुकतेच वैद्यकीय शिक्षणविभागाच्या संकेतस्थळावर टाटा ट्रस्ट्स च्या सहकार्यातून ऑनलाईन नोंदणीकरिता लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. त्याकरिता आपण www.dmer.org या वेबसाईटवर जाऊन अवयव दान नोंदणी करु शकतात.
 

आपल्या बोधचिन्हामध्ये ‘त्येन तक्तेन भुंजिया’ लिहलेय याचा नेमका अर्थ काय ?
ही संस्कृत ओळ आहे याचा अर्थ ‘त्यागातच आनंद आहे’ असा आहे. पंतप्रधानांनी अवयवदानाबाबत या सुंदर ओळींचा उल्लेख केला आहे.

आपण कोणकोणत्या अवयवांचे दान करु शकतो ?
जीवंत व्यक्ती एक मूत्रपिंड (किडनी) किंवा यकृताचा (लिवर) काही भाग दान करु शकतो. तर ब्रेन डेड व्यक्ती मूत्रपींड, यकृत, फुप्फुस, स्वादूपिंड, हृदय, त्वचा, डोळे, आतडी दान करु शकतो. त्यामुळे 1 व्यक्ती 8 ते 9 लोकांना नवे जीवन या माध्यमांतून देऊ शकते.

अवयवदान कोणालाही करु शकतो काय ?
जीवंतपणी दान करावयाचे असल्यास केवळ जवळचे नातेवाईक म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, मुलगा, मुलगी, पती, पत्नी यांच्यातच होऊ शकते. या व्यतिरिक्त व्यक्तीला जीवंतपणी अवयवदान करावयाचे झाल्यास शासनाने नेमलेल्या समित्यांना परवानगी घ्यावी लागते. परंतु ब्रेन डेड अवस्थेत अवयवदान करावयाचे झाल्यास ते अवयवदान करण्याचा अधिकार हा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडे असतो. समितीमार्फत उपलब्ध यादीतून रुग्णांची निकड, प्रतीक्षा कालावधी व इतर आवश्यक बाबी पडताळून अवयवदान करता येते. 

मस्तिष्क स्तंभ, मृत्यू व कोमा यात फरक काय ?
 
कोमामधील व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता असते. कारण त्या व्यक्तीच्या मेंदुचा मृत्यू झालेला नसतो. ब्रेनडेड व्यक्ती म्हणजे ज्याच्या मेंदूचा मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती शुद्धीवर येण्याची सुतराम शक्यता नसते.

किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला वयाची मर्यादा आहे काय ?
आपल्याला इतर काही आजार नसेल व शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तर कोणत्याही वयात किडनी प्रत्यारोपण करता येते.

कोणत्या कारणांमुळे किडनी प्रत्यारोपण करता येणार नाही ?
कर्करोग असल्यास, मद्य अथवा ड्रग्जच्या आहारी गेलेली व्यक्ती, असाध्य मानसिक विकार असे आजार असल्यास डॉक्टर सर्व बाबींची शहानिशा करुन आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतात. 

प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये मृत्यू होऊ शकतो काय ?
शक्यता जवळ जवळ नाहीच. इतर मोठ्या शस्त्रक्रियेप्रमाणे ह्या शस्त्रक्रियेतही एक टक्क्यापेक्षा कमी लोक दगावू शकतात. परंतु ऑपरेशन न केल्यानेही काही धोका टळत नाही

डायलिसीस पेक्षा किडनी प्रत्यारोपण जास्त चांगले आहे काय ?
निश्चितच, कारण डायलिसीस 24 तास ठेवता येत नाही. त्यामुळे रक्तातली अशुद्धता केवळ त्याच वेळात काढता येते. परंतु किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले असल्यास आपले रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया 24 तास सुरु राहते.

एकच किडनी शिल्लक राहिल्यास काही त्रास होऊ शकतो काय ?
सर्व साधारणपणे नाही. एक किडनी तुमचे शारीरिक कार्य योग्यरित्या सांभाळण्यास सक्षम आहे. 

यकृताचा काही भाग जीवंतपणी देणाऱ्या दात्याला काही उपाय होऊ शकतो काय ?
शस्त्रक्रिया ही मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे इतर आजारांमध्ये जो धोका असतो तोच धोका एक टक्क्यापेक्षा कमी या शस्त्रक्रियेत असतो. परंतु एकदा शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कोणताही धोका नसतो.

काही प्रसिद्ध व्यक्तिची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे ?
ॲपल कंपनीचे सीइओ स्टीव्हजॉब्ज यांचे यकृताचे प्रत्यारोपण झाले आहे. अमेरिकन ॲक्टर पटीनकिन यांना डोळ्यांच्या बुब्‍बुळाचे प्रत्यारोपण झाले आहे. बास्केटबॉल स्टार अलोन्झोमोर्निंग यांचे किडनीचे प्रत्यारोपण झाल्यानंतर त्यांनी 2006 मध्ये बास्केटबॉल चॅम्पियनशीप जिंकली. साऊथइंडियन हिरो राजकुमार यांनीही अवयवदान केले आहे. 

कोणत्या रुग्णालयात अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते ?
 
अवयव काढण्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाला शासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. ज्या रुग्णालयाला हा परवाना मिळालेला आहे तेच रुग्णालय अवयवदानासाठी अवयव काढू शकतात. 

अवयवदान करणाऱ्यांसाठी शासनाकडून काही फायदे मिळतात का ?
नाही. अवयवदान हे एक अत्यूच्च दान आहे. यामध्ये काही मोबदला, पैसे मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. परंतु शस्त्रक्रिया व त्यासाठी लागणारा खर्च मात्र दात्याला करावा लागत नाही. यासोबतच अवयवदान करणाऱ्या व्यक्तींचा मेडिक्लेम किंवा इन्शुरन्‍सच्या माध्यमातून अथवा नव्या महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्याबाबत शासन विचार करीत आहे.

(महान्यूजवरून)

No comments:

Post a Comment