Wednesday 3 August 2016


                   पालकमंत्री गिरीष महाजन यांची पूरग्रस्त भागाला भेट



       नाशिक, दि.2:-  शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी असून पूराने प्रभावित झालेल्या नागरीकांच्या मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतीसाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी पूरग्रस्तांशी संवाद साधताना केले.  

         श्री. महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे आदी उपस्थित होते.
           नागरिकांच्या जिवीताच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. मदत कार्यासाठी सर्व आवश्यक यंत्रणा सुसज्ज ठेवावी. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी  स्थलांतरीत करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवावे व सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी,  अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

          पालकमंत्र्यांनी होळकर पूल परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गणेशवाडी येथील शाळा क्र. 30 येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांना सुविधा पुरविण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना केल्या. श्री. महाजन यांनी सायखेडा येथे भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पूरग्रस्तांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

त्यांनतर पालकमंत्र्यांनी नाशिक शहरातील मालवाडी येथे पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांना अन्नाच्या पाकीटांचे वाटप केले. त्यांनी मल्हारखान भागासही भेट दिली.

No comments:

Post a Comment