Sunday 7 August 2016

पूरबाधित भागात साथीच्या रोगाबाबत विशेष दक्षता  घ्या
                                                   -गिरीष महाजन

नाशिक दि.7- पूरबाधित भागात साथीचे रोग पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी. अशा भागात औषध फवारणी करण्यात येऊन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे पूरस्थिती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अनिल चव्हाण, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब वाकचौरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एस.पी.जगदाळे  आदी उपस्थित होते.

श्री.महाजन यांनी पूरपरिस्थितीनंतर करण्यात येणाऱ्या मदतकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, पूरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत पुर्ण करण्यात येऊन मदतीसाठीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. पूरग्रस्त भागात टँकरने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पूरामुळे वाहून गेलेली जानोरी येथील पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करण्यात यावी. रस्त्याच्या नुकसानाची पाहणी करून त्वरीत अहवाल तयार करावा. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांच्या ठिकाणी इमारती उभारण्यात आल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध झाल्याचे सांगून शहरात अशा भागांचे सर्वेक्षण करून पाण्याचा निचरा होण्याबाबत आवश्यक उपाययोजना महापालिकेने त्वरीत कराव्यात, असे निर्देश श्री. महाजन यांनी दिले. पूरानंतर अनेक भागात साचलेला गाळ आणि कचरा स्वच्छ करण्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी चांदोरी व सायखेडा येथे 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली. पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मलेरीयाबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शेजारीत गावातल्या प्राथमिक वैद्यकीय केंद्रातील अधिकारी पूरग्रस्त भागात नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शहरातील कचरा आणि गाळ स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे 24 जेसीबी आणि 33 ट्रॅक्टर्स, 7 स्क्रॅपर्स आणि 8 डंपर्सची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन यंत्राची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी  अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ब्रिटीशकालीन जुन्या पुलांची पाहणी करून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. चांदोरी आणि सायखेडा यांना जोडणाऱ्या पूलाचे पुरामुळे नुकसान झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. तसेच त्याशेजारी नवा पूल तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी  पालकमंत्री महाजन यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. खुल्या बाजारात शेतमाल विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, असेच शासनाचे धोरण आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.  

No comments:

Post a Comment