Monday 9 January 2017

रस्ता सुरक्षेबाबत समाजात जागरुकता आणणे गरजेचे-रविंद्र सिंगल


नाशिक, दि.9 :- वाहतूक नियमांच्या वाढत्या उल्लंघनाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहताना रस्ता सुरक्षेाबाबत समाजात जागरुकता आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सार्वजनि बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी. खोडसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर आदी उपस्थित होते.

श्री.सिंगल म्हणाले, रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मानसिकतेत परिवर्तन आणणे महत्वाचे आहे. पोलीस आणि परिवहन विभाग मिळून रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता आणण्याचे उपक्रम आयोजित करीत आहेत. अपघाताची नोंद करताना हेल्मेट घातले असल्याबाबत नोंद करण्याच्यादेखील सुचना देण्यात आल्या आहेत. रस्ता तयार करताना तांत्रिकबाबींकडे देखील लक्ष देण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांनी दुचाकी वाहन वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत आवाहन करावे. तसेच शाळांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत साक्षरता आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस विभाग करीत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री.राधाकृष्णन म्हणाले, विविध गुन्ह्यात होणाऱ्या मृत्युपेक्षा रस्ते अपघात होणाऱ्या मनुष्यहानीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. प्रत्येकाचा जीव बहुमुल्य आहे. बऱ्याचदा अपघातात घरातील कर्ता पुरुष गमवल्याने कुटुंबासमोर गंभीर समस्या उभी राहते. त्यामुळे सामाजिक दृष्टीकोनातून असे अपघात टाळणे महत्वाचे असून हे अभियानाचे उद्दीष्ट आहेसीटबेल्ट वापरणे, हेल्मेट घालणे, व्यसन न घेता वाहन चालविणे हा सवयीचा भाग होण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा ही नागरिकांपासून विविध यंत्रणांपर्यंत सर्वांची जबाबदारी असून व्यापकदृष्ट्या मोहिम राबविल्यास अपघातांची संख्या कमी करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे, अशी सुचना त्यांनी केली. रस्त्यावरून पायी अथवा वाहनाने जाणाऱ्या नागरिकाच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.शंभरकर यांनी  रस्ता सुरक्षेविषयी माहितीचा प्रसार करण्याचे आवाहन करताना वाहतूकीचे नियम न पाळण्याची प्रवृत्ती अपघातास कारणीभूत असल्याचे सांगितले. नियम पाळल्यास अपघात कमी होतील, असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक शिंदे यांनी वाहन चालविताना अतिउत्साह मृत्युस कारणीभूत होत असल्याचे सांगून रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी होण्याचे तरुणाईला आवाहन केले.
श्री.कदम म्हणाले, एकत्रित प्रयत्नाने अपघात टाळणे शक्य आहे. अपघातामुळे आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. परिवहन विभाग शाळा-महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पाटील यांनी वाहतूक नियमांबाबत स्वयंशिस्त महत्वाची असल्याचे नमूद करून शिक्षक आणि पालकांची भूमीका जनजागृतीसाठी महत्वाची असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात श्री.कळसकर यांनी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यामागची भूमिका विषद केली. देशात दरवर्षी साडेचार लाख अपघातात 1 लाख 40 हजारांपेक्षा अधिक नागरीक मृत्युमुखी पडतात. राज्यात हे प्रमाण 13 हजार तर जिल्ह्यात साधारण एक हजार आहे. चालू वर्षी परिवहन आणि पोलीस विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
अभियानाचे उद्घाटन श्री.सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वाहतूकीची पाठशाळा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हेल्मेटबाबत जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाचे उद्घाटन करण्यात आले.

-----

No comments:

Post a Comment